रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 07:35 AM2023-11-18T07:35:04+5:302023-11-18T07:35:10+5:30

ऑक्टोबरमध्ये १ कोटी २६ लाख जणांचे ‘उड्डाण’

Record: 22 crore 42 lakh people traveled by air in 10 months | रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास

रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास

मुंबई : गेल्या दहा महिन्यांत देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून नुकत्याच संपलेल्या ऑक्टोबर महिन्यात देशात एकूण एक कोटी २६ लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) या संदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली असून ऑक्टोबर २०२३ मध्ये देशात विमान प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ ही ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत ११ टक्क्यांनी अधिक आहे. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १ कोटी १४ लाख लोकांनी विमान प्रवास केला होता. सध्या भारतीय विमान क्षेत्रात इंडिगो विमान कंपनीने अव्वल हिस्सेदारी राखलेली असून कंपनीच्या विमानाच्या माध्यमातून या कालावधीमध्ये एकूण ७९ लाख लोकांनी प्रवास केला. मात्र, तरीही इंडिगोच्या मार्केट हिस्सेदारीमध्ये यंदा किरकोळ घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात इंडिगोची मार्केट हिस्सेदारी ६३.४ टक्के इतकी होती. ती ऑक्टोबर महिन्यात ६२.६ टक्के झाली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक पवित्रा घेत नवीन विमाने बाजारात सादर करणाऱ्या एअर इंडिया कंपनीच्या हिस्सेदारीत मात्र वाढ झाल्याचे दिसून आले. सप्टेंबरमध्ये कंपनीची मार्केट हिस्सेदारी ९.८ टक्के इतकी होती, ती वाढत आता १०.५० टक्के झाली आहे. तर, गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत असलेल्या स्पाईस जेट कंपनीच्या हिस्सेदारीत देखील किरकोळ स्वरूपात वाढ नोंदली गेली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत एकूण १२ कोटी ५४ लाख लोकांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असून ९ कोटी ८८ लाख लोकांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. गेल्या वर्षीच्या याच दहा महिन्यांच्या कालावधीच्या तुलनेत ही वाढ २६.९८ टक्के इतकी अधिक आहे.

 ३० हजार लोकांना फटका 
ऑक्टोबर महिन्यात विमान सेवा रद्द झाल्याचा फटका ३० हजार ३०७ प्रवाशांना बसला. तर, तब्बल १ लाख ७८ हजार २२७ लोकांना विमानाला विलंब झाल्याचा त्रास सहन करावा लागला.

Web Title: Record: 22 crore 42 lakh people traveled by air in 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.