राणीच्या बागेत रेकॉर्डब्रेक गर्दी; तब्बल ३९ हजार ७९२ पर्यटकांची ‘दिवाळी भेट’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:24 AM2023-11-16T11:24:22+5:302023-11-16T11:24:29+5:30
सलग सुट्ट्यांचा आला योग
मुंबई : शाळांना आणि कार्यालयांना असलेली दिवाळी पाडव्याची सुट्टी असा योग जमून आल्याने राणीच्या बागेत १४ नोव्हेंबर रोजी रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळाली. पाडव्याच्या दिवशी प्राणिसंग्रहालयाला ३९,७९२ पर्यटकांनी भेट दिली. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत १४ लाख ४१ हजार एवढा महसूल प्राप्त झाला आहे. पर्यटकांची संख्या ही या वर्षीच्या १ जानेवारी २०२३ पेक्षा जास्त होती, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
१ जानेवारी २०२३ रोजी ३९,१०६ पर्यटकांनी भेट दिली होती व १४ लाख ४३ हजार इतका महसूल गोळा झाला होता. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करून विविध पक्षी, प्राणी आणले आहेत. राणीबागेत दर दिवशी ६ ते ७ हजार पर्यटक भेट देतात. शनिवार, रविवारी तर पर्यटकांची संख्या २१ हजारांपर्यंत पोहोचते. १४ नोव्हेंबरच्या दिवशी पर्यटकांनी दिलेल्या भेटीमुळे प्राणिसंग्रहालयाने आपल्या शिरपेचात नवीन तुरा खोवला असून, १ जानेवारी २०२३ चा विक्रम मोडीत काढला आहे.
ऑनलाइन बुकिंगला पसंती
सुट्टीच्या दिवशी पर्यटक राणीची बाग पाहण्यासाठी येत आहेत. विशेष करून सणांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांना घेऊन मुंबईकर येथे येत आहेत. ऑनलाइन बुकिंगला पर्यटक अधिक पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बाग आज बंद
भाऊबीजनिमित्त सुटी असूनही वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय खुले ठेवण्यात आले. त्यामुळे गुरुवारी, १६ नोव्हेंबरला बाग बंद राहणार असल्याचे पालिकेकडून कळविण्यात आले आहे.
गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक
राणीच्या बागेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकांसोबत खासगी सुरक्षा रक्षक आणि बाऊन्सर्स ही नेमण्यात आले आहेत. गर्दी लक्षात घेऊन एकूण ५५ सुरक्षा रक्षक नेमले जातात.
तारीख एकूण पर्यटक गोळा झालेला महसूल
९ नोव्हेंबर ५२८१ २१,३०२५
१० नोव्हेंबर ३,१५६ १,६०,१००
११ नोव्हेंबर ९,५७४ ३,६६,७००
१२ नोव्हेंबर १४,४११ ५,७१,१२५
१३ नोव्हेंबर ३२,७८४ १२,२८,८२०
१४ नोव्हेंबर ३९,७९२ १४,४१,५२५
१५ नोव्हेंबर १४८७३ ५,६६,७७५