मुंबई : मुंबईकरांची बुधवारची सकाळ उगवली भुरभूर पावसाने. मात्र, तासातासाला पावसाचा वेग वाढू लागला आणि त्याबरोबर सखल भागात साचू लागले. त्यामुळे मुंबईकरांच्या १८ वर्षांपूर्वीच्या ‘२६ जुलै’च्या कटु आठवणी जागृत झाल्या आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला. दरम्यान, यंदाच्या मोसमात जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने तीन वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. २०२० साली जुलैत पावसाची नोंद १ हजार ५०२.६ मिमी होती. यंदा ही नोंद १ हजार ५१२.६ मिमी एवढी आहे. बुधवारी मुंबईत १२४ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान खात्याने बुधवारी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाची अगदीच सामान्य हजेरी लागत होती. सकाळी ११ नंतर मात्र मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विद्याविहार, घाटकोपर, कुर्ला, साकीनाका, पवई आणि सायन या परिसरात पावसाने तुफान फटकेबाजी सुरू केली. दुपारी बारा वाजता दरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे लालबहादूर शास्त्री मार्गावरील शीतल सिनेमा आणि कल्पना सिनेमा या दोन सिग्नलच्या ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले होते.
पश्चिम उपनगरात दहिसर, साकीनाका, पवई, अंधेरी या परिसरातदेखील मोठ्या पावसाची हजेरी लागत होती. साकीनाका परिसरात पावसामुळे काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती तर सातत्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनांचा वेगही कमी झाला होता. मुंबई शहराचा विचार करता माटुंगा, दादर, प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, नरिमन पॉइंट, गिरगाव या परिसरात दुपारी दोन वाजता मोठ्या पावसाने हजेरी लावली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण सात तलावांपैकी तुळशी तलावापाठोपाठ बुधवारी तानसा आणि विहार हे दोन तलाव भरून वाहू लागले. सात तलावांत सध्या ८ लाख ५२ हजार ९५७ दशलक्ष लिटर इतका ५८.९३ टक्के जलसाठा जमा झालेला आहे. हा जलसाठा पुढील २२१ दिवस म्हणजे २१ फेब्रुवारीपर्यंत पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळेच सात तलावांपैकी एक तुळशी तलाव २० जुलै रोजी रात्री १.२५ वाजता वाहू लागला तर विहार तलाव बुधवारी मध्यरात्री १२.४८ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. पालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ३ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली असल्याने मुंबईत अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात लागू असल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
सात तलावांतील पाणीसाठा (२६ जुलैपर्यंत)
तलाव क्षमता पातळी पाणीसाठाअप्पर वैतरणा २,२७,०४७ ७१,३२९मोडकसागर १,२८,९२५ १,१३,०५६तानसा १,४५,०८० १,४५,०८०मध्य वैतरणा १,९३,५३० १,३१,५०३भातसा ७,१७,०३७ ३,५६,३७८विहार २७,६९८ २७,६९८तुळशी ८०४६ ८०४६एकूण पाणीसाठा १४,४७,३६३ ८,५२,९५७
आज शाळा, कॉलेजांना सुट्टी
हवामान खात्याने बुधवारी रात्री ८ ते गुरुवार दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांनी मुंबईतील पालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी शाळा व महाविद्यालयांना गुरुवार, २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
२४ तासांतला पाऊस...
सांताक्रुझ ८६कुलाबा ४४वांद्रे ५८दहिसर ११२राम मंदिर ८७चेंबूर ३२फोर्ट ४३सायन ५१कुर्ला १०८