ठाण्यात रेकॉर्ड ब्रेक दिवाळी पहाट!
By Admin | Published: October 30, 2016 12:30 AM2016-10-30T00:30:00+5:302016-10-30T00:30:00+5:30
ठाण्यात राममारुती रोड, तलावपाळी येथे जमून दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा यंदाही तरुणाईने राखली. गेल्या पाच वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक गर्दी यंदा जमली. अवघी तरुणाई
ठाणे : ठाण्यात राममारुती रोड, तलावपाळी येथे जमून दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा यंदाही तरुणाईने राखली. गेल्या पाच वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक गर्दी यंदा जमली. अवघी तरुणाई लोटल्याने या संपूर्ण परिसराला सकाळपासूनच तारुण्याची झळाळी चढल्याचे दिसून आले. कपड्यांत यंदा इण्डो-वेस्टर्न फॅशन दिसून आली.
सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात नरकचतुर्दशीच्या दिवशी राममारुती रोड ते तलावपाळी परिसरात पहाटे जमून दिवाळी पहाटचा आनंद लुटण्याची ठाणेकरांची परंपरा. यंदाही ती कायम राखत रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. चालायलाही जागा नव्हती, इतका गर्दीचा महापूर या दोन्ही रस्त्यांवर होता. दरवर्षी पारंपरिक पोशाखात येणारी तरुणाई यंदा मात्र इण्डो वेस्टर्न गेटअपमध्ये दिसून आली.
जमलेल्यांनी परस्परांवर दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. केवळ महाविद्यालयीन, नोकरदार तरुण मंडळी नव्हे, तर शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनीही मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी तेथे आले होते. या दिवाळी पहाटेच्या उत्साहात रंगत आणली, ती रॉक बॅण्ड, डीजेबरोबरच ढोलताशांच्या गजराने. रॉक बॅण्ड, डीजेवर नव्हे तर ढोलताशांवरही तरुणाई थिरकली. अर्थात, या गर्दीत फटाके फोडून काहींनी गोंधळ घातला, पण बाकीच्या तरुणाईच्या उत्साहाच्या उधाणापुढे तो फिका पडला.
शनिवारी ठिकठिकाणी दिवाळी पहाटनिमित्त गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले होते. एकीकडे या कार्यक्रमांचा आस्वाद नागरिक लुटत होते; तर दुसरीकडे तरुणाई राममारुती रोड, मासुंदा तलावाच्या परिसरात जमून दिवाळी शुभेच्छा देण्यात रंगली होती. सर्वत्र झिंगझिंग झिंगाट असताना दुसरीकडे सेल्फीचाही उत्साह दिसून आला. चैतन्याने रसरसलेले मंगलमय आणि उत्साही वातावरण या वेळी ठाण्यात पाहायला मिळाले. सकाळी ७ वाजल्यापासून राममारुती रोड, मासुंदा तलावाच्या ठिकाणी आलेल्या तरुणाईने दुपारी १२ नंतर काढता पाय घेतला आणि त्यानंतर मात्र वाहतूककोंडीची समस्या उद््भवली. ठिकठिकाणची रेस्टॉरंट, हॉटेल गर्दीने तुडुंब भरली होती. (प्रतिनिधी)
मोबाइल नेटवर्क जॅम
वाढत्या गर्दीमुळे राममारुती रोड, मासुंदा तलाव याठिकाणी मोबाइलचे नेटवर्कजॅम झाले होते. नेटवर्कप्रॉब्लेममुळे मित्रमैत्रिणींचा संपर्क होत नसल्याने एकमेकांना शोधण्यातच त्यांचा काहीसा वेळ गेला. याबाबत, तरुणाईने तीव्र नाराजी व्यक्त केली.