मुंबई : उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठलेला असतानाच आता मुंबईसहमहाराष्ट्रदेखील थंडीने कुडकुडू लागला आहे. कारण हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, सुरु असलेल्या मौसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे. तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे ७.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भात ब-याच भागात तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
मुंबई आणि राज्यात ठिकठिकाणी किमान तापमान खाली घसरत असतानाच २५ डिसेंबरपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, अशी शक्यतादेखील हवामान खात्याने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईचा विचार करता बुधवारसह गुरुवारी येथील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १७ अंश येईल.
-----------------
शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.परभणी ७.६गोंदिया ७.८पुणे ८.१नाशिक ८.४नागपूर ८.६जळगाव ९सातारा ९औरंगाबाद ९.२अकोला ९.६नांदेड १०वर्धा १०बीड १०.१वाशिम १०.२चंद्रपूर ९.६मालेगाव १०.२महाबळेश्वर ११.३सोलापूर १२.१अमरावती १२.५सांगली १२.६कोल्हापूर १४.५मुंबई १६