मुंबई : सरळ चढ असलेली शिखरे सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंज, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अंतहीन चढाई आणि हवामानातील बदल अशी आव्हाने पार करत मुंबईच्या आठ वर्षांच्या गृहिता विचारे हिने कठीण असा माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प २८ ऑक्टोबर रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केला. गृहिता मुंबईत गुरुवारी दाखल झाली असून, विमानतळावर तिचे तिच्या कुटुंबीयांसह मित्र परिवाराने जंगी स्वागत करत जल्लोष केला.
माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठताना आणि ते ध्येय साध्य करताना भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र गृहिताकडे जिद्द होती. काहीही झाले तरी ते उंच टोक गाठायचे म्हणजे गाठायचेच, असा निर्धार तिने मनाशी बाळगला होता. ही जिद्द उराशी बाळगून वडील सचिन विचारे यांच्यासह तिने ती उंची तिने गाठली. आजवर १० वर्षांच्या मुलीने ही उंची गाठण्याचा विक्रम केला होता. तिच्यापेक्षा दोन वर्षाने लहान असलेल्या गृहिताने ही कामगिरी करून नवा विक्रम केला आहे.
खूप थंडी होती. खूप बर्फ होता. मी पाच प्रकाराचे जॅकेट आणि भरपूर सारे कपडे घातले होते. तरीपण मला खूप थंडी वाजली. आमच्या पाण्याच्या बाटल्यांमधील पाण्याचादेखील बर्फ झाला होता. मी पहिल्यांदा खूप मोठे डोंगर बघितले. गाढव, घोडे आणि याकदेखील बघितले. हेलिकॉप्टरदेखील भरपूर बघितले. मला या ट्रेकमध्ये खूप दमायला झाले; पण मला हा ट्रेक पूर्ण करायचा आहे, असा निर्धार मी मनाशी केला होता. मला आता आत्मविश्वास आला आहे. आता मी आणखी मोठे ट्रेक करणार. - गृहिता विचारे
कठीण ट्रेक
- १३ दिवसांचा ट्रेक
- काठमांडूपासून (समुद्र सपाटीपासून १४०० मीटर उंच) रामेछाप विमानतळापर्यंत ४ तासांचा
- रामेछाप ते लुक्ला विमानाने प्रवास (समुद्र सपाटीपासून २८४३ मीटर उंचीवर)
कसा आहे ट्रेक?
वास्तविक हा ट्रेक १४८ किमीचा आहे. लुक्ला (समुद्रसपाटीपासून २८४३ मीटर उंच) ते फाकडिंग (२६१० मीटर उंच) ते नामचे बाजार (३४४० मीटर) ते टिंगबोचे (३८६० मीटर) ते डिंगबोचे (४४१० मीटर) ते लोबुचे (४९१० मीटर) ते गोरक्षेप (५१४० मीटर) ते कालापथर (५५५० मीटर) आणि अखेरीस मानाचा रुरा म्हणजेच एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर).