Join us  

मुंबईत टू बीएचके घरांना विक्रमी मागणी! भाड्याच्या घरांनाही मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 11:19 AM

नव्याने घर खरेदी करण्याचा ट्रेण्ड जोरात असून, त्यातही अधिक मोठे घर घेण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसून येते.

मुंबई : गेल्या वर्षी मुंबई शहर व उपनगरात दीड लाखापेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली असून, वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे निवासी घरांच्या विक्रीत दोन बेडरूम, हॉल व किचन अर्थात टू बीएचके घरांच्या विक्रीचा वाटा हा ४२ टक्के इतका राहिला आहे. नव्याने घर खरेदी करण्याचा ट्रेण्ड जोरात असून, त्यातही अधिक मोठे घर घेण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसून येते.

भाड्याच्या घरांनाही मोठी मागणी

उपनगरात मोठ्या प्रमाणावर भाड्याने घर घेऊन राहण्याचा कलही वाढत आहे. मुंबई शहर व उपनगरात आजच्या घडीला किमान २५ हजार ते महिन्याकाठी साडे पाच लाख रुपयांपर्यंत विभागनिहाय भाड्याच्या किमती आहेत.

२०२४ मध्येही खरेदीचा उत्साह कायम

  २०२३ च्या वर्षात मुंबईत दोन महिन्यांचा अपवाद वगळला, तर प्रत्येक महिन्यात १० हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली. याद्वारे सरकारलादेखील १० हजार कोटींच्या घरात महसूल प्राप्त झाला. जवळपास दीड वर्षापासून भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवलेले आहेत.

  चालू वर्षातदेखील आगामी ६ महिने व्याजदर जैसे थे राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच चालू वर्षातदेखील घर विक्रीचा उत्साह कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी निवासी मालमत्तांची झाली सर्वाधिक विक्री

गेल्या वर्षी मुंबईत ज्या मालमत्ताची विक्री झाली त्यामध्ये ८२ टक्के वाटा हा निवासी मालमत्तांचा आहे, तर उर्वरित १८ टक्के मालमत्ता या दुकाने, व्यावसायिक कार्यालये अशा स्वरूपाच्या आहेत.

टू बीएचके घरांना वाढती मागणी का?

मुळात विकासकांतर्फे जी घरे बांधली जात आहेत; त्यामध्ये किमान आकारमान असलेल्या म्हणचे दोन बेडरूम, हॉल व किचन या पद्धतीच्या घरांची संख्या अधिक आहे. विभागनिहाय विचार केला, तर वन बीएचके आणि टू बीएचकेच्या किमतीमधील तफावतदेखील काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे लोकांचा कल या घरांच्या खरेदीकडे अधिक आहे. टू बीएचके घरांचे सरासरी आकारमान ५०० चौरस फूट ते एक हजार चौरस फूट इतके आहे.

  केवळ टू बीएचकेच नव्हेतर; तीन, चार किंवा त्यापेक्षाही अधिक मोठ्या आकारमानाची घरे घेण्याकडेही लोकांचा कल वाढत आहे.

  गेल्या वर्षी मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीने ८ ते १० हजार कोटींची उलाढाल केल्याची माहिती आहे.