महापारेषणने मंगळवारी वाहून नेली विक्रमी वीज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 02:48 AM2021-03-11T02:48:03+5:302021-03-11T02:48:19+5:30
तब्बल २५,८०० मेगावॅट विजेचे पारेषण
मुंबई : औद्योगिक क्षेत्रातील विजेची मागणी वाढली असतानाच महापारेषणने मंगळवारी दुपारी ११ वाजून १६ मिनिटाला २५,८०० मेगावॅट विजेचे पारेषण केले. हा राज्याचा वीज मागणीचा नवा उच्चांक आहे. यावेळी महावितरणने २२ हजार ३३९ मेगावॅट इतकी मागणी नोंदवली. कोणतेही भारनियमन न करता विनाअडथळा २५ हजार ८०० मेगावॅट इतके विजेचे पारेषण करण्यात आले आहे.
मुंबईची मागणी यामध्ये २,८६४ मेगावॅट एवढी होती. वाढते तापमान व कृषी वीजमागणीमुळे विजेची मागणी वाढली आहे. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी २४,२०० मेगावॅट इतक्या विजेचे पारेषण केल्याची नोंद आहे. यावरून महापारेषणची पारेषण यंत्रणा अतिशय सक्षम असल्याचे दिसून आले आहे, असा दावा महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी केला आहे
.महानिर्मितीने मंगळवारी दुपारी ४.४० वाजता एकूण १० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक विक्रमी शिखर सर केले. महानिर्मितीच्या ६० वर्षांतील सर्वोच्च वीजनिर्मितीचा हा नवा उच्चांक आहे.
मुंबईसह राज्याच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता उकाडाही वाढला आहे. त्यामुळे ७ मार्चपासून विजेची मागणी वाढली आहे.
त्यानुसार विजेची निर्मिती करून पुरवठा केला जात आहे. मंगळवारचा उच्चांक गाठताना महानिर्मितीने २० मे २०१९ रोजीचा १० हजार ९८ मेगावॅटचा उच्चांक मोडला.
वीजनिर्मिती
nऔष्णिक वीजनिर्मितीद्वारे ७,९९१ मेगावॅट
nवायू वीजनिर्मिती केंद्राद्वारे २६४ मेगावॅट
nजल विद्युत केंद्राद्वारे २,१३८ मेगावॅट
nसौरऊर्जा प्रकल्पामधून ५० मेगावॅट
आकडा गाठण्याची तिसरी वेळ
nमहावितरणची विजेची मागणी २२ हजार १२९ मेगावॅट.
nराज्याची एकूण वीजनिर्मिती १६ हजार ४२९ मेगावॅट इतकी होती.
n१० हजारपेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची ही तिसरी वेळ आहे.
n८ मार्च रोजीही महानिर्मितीने १० हजार ९७ मेगावॅट तर २० मे २०१९ रोजी १० हजार ९८ मेगावॅट विजेची निर्मिती केली हाेती.