अनुकूल वातावरणाचा परिणाम होण्याची चिन्हे
मुंबई : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेली कपात आणि विकासकांना दिलेल्या सवलतींमुळे घरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वाढू लागले असून आँक्टोबर ते डिसेंबर या उत्सवी काळात गेल्या तिमाहीच्या तुलनेत ३६ टक्के जास्त घरांची विक्री होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या तिमाहित मुंबई महानगर क्षेत्रात ९३०० घरांची विक्री झाली होती. ती विद्यमान तिमाहीत १२,६०० पेक्षाही पुढे पोहचेल असे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत दोन तिमाहीत झालेली ही सर्वाधिक वाढ असेल असेही सांगितले जात आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित सल्लागार संस्था असलेल्या अँनराँक प्राँपर्टीज यांनी देशातील सात प्रमुख शहरांतील बाजारपेठेतील विद्यमान परिस्थिती आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा अंदाज घेत एक सर्वेक्षण अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यात हे निरीक्षण मांडण्यात आले आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत पुण्यात ४,८५० घरांची विक्री झाली होती. या तिमाहीत त्यात जवळपास ३४ टक्के भर पडून ती संख्या ६५०० पर्यंत वाढेल असा अंदाज आहे.
आँक्टोबर ते डिसेंबर या कालाखंडात केवळ २०१५ साली मुंबई आणि पुण्यातील घरांच्या विक्रीत ३० टक्के वाढ नोंदविण्यात आली होती. उर्वरित सर्व प्रमुख शहरांमध्ये व्यवहार कमी झाले होते. २०१८ आणि २०१९ साली ७ ते ११ टक्के वाढ झाली होती. मात्र, त्या दरम्यानच्या २०१६ आणि २०१७ साली नोटबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे उत्सवी काळातही घरांच्या विक्रीत घट झाली होती. मुंबईत ती घट जवळपास ३५ टक्के होती. मात्र, यंदा सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. विकासकांना घरांचे किंमत कमी करण्यासाठी विविध सवलतींचा वर्षांव केला आहे. त्याशिवाय गृह कर्जसुध्दा कधी नव्हे एवढे स्वस्त झाले आहे. त्यामुळे यंदा मुंबईतील घरांची विक्री गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत वाढेल असा होरा आहे. या सर्व सवलतींमुळे घरांच्या किंमती ७ ते १५ टक्क्यांनी कमी झाल्या असल्याने त्यांच्या खरेदीकडे लोकांचा ओढा वाढत असल्याची माहिती अँनराँकचे चेअरमन अनुज पुरी यांनी दिली.
जुलै ते सप्टेंबरच्या तुलनेत आँक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत झालेली वाढ (%)
शहर | २०१५ | २०१६ | २०१७ | २०१८ | २०१९ | २०२० (अपेक्षित) |
मुंबई | ३० | -३५ | -१५ | ११ | ७ | ३६ |
पुणे | ३० | -३७ | -१८ | ७ | १० | ३४ |
दिल्ली | -१३ | - ५९ | -२३ | १२ | ९ | ३१ |
बंगळूरू | -८ | -४१ | -२१ | -९ | ७ | ३५ |
हैद्राबाद | -१२ | -६३ | -२२ | ३ | ६ | २१ |
चेन्नई | -५ | -५७ | -३५ | १२ | ६ | २२ |
कोलकत्ता | -१८ | -५८ | -३० | -१० | ४ | ३० |
एकूण | ३ | - ४७ | - २१ | ४ | ७ | ३३ |