१५ दिवसांत उभ्या राहिलेल्या काेविड केंद्रात ऐतिहासिक क्षणाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:06 AM2021-01-17T04:06:42+5:302021-01-17T04:06:42+5:30
लसीकरण सुरू : आजचा क्षण मैलाचा दगड असल्याची एमएमआरडीएने व्यक्त केली भावना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा संसर्ग ...
लसीकरण सुरू : आजचा क्षण मैलाचा दगड असल्याची एमएमआरडीएने व्यक्त केली भावना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असतानाच त्याला समूळ नष्ट करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठ भावनेने आणि कुशल पद्धतीने केवळ १५ दिवसांत वांद्रे - कुर्ला संकुलात उभारलेल्या कोविड केंद्रात शनिवारी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही उभारलेल्या या केंद्रात लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाची नोंद झाल्याचा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी बीकेसी येथील कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. यावेळी प्राधिकरणानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. आजचा क्षण मैलाचा दगड ठरला आहे. या लसीकरण मोहिमेत भाग घेत असलेल्या प्रत्येकास आमच्याकडून शुभेच्छा आहेत. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मैदानावर अगदी सुरुवातीला सर्वात मोठे कोविड केंद्र उभारले होते, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेड्स निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली होती. यात बीकेसी येथील कोविड सेंटरचा समावेश आहे . जुलै २०२० मध्ये येथे उपाययाेजनांसाठीचा दुसरा टप्पा उभारण्यात आला होता. तत्पूर्वी साधारणता महिन्याभरापूर्वी बीकेसीतील मैदानावर १००० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त १२०० खाटांचे आयसीयू, डायलेसिसीच सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले होते, असे एमएमआरडीएने सांगितले.
........................................