- मनोहर कुंभेजकर मुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून नोटा अमलात आले. यंदा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निरुपम हे मनसेचे कट्टर शत्रू आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व शहामुक्त भारत असा विडा उचलला आहे. त्यामुळे मनसे निरुपम व कीर्तिकर यांना मतदान करण्याचा प्रश्नच नसून येथील मनसैनिक नोटा मतदान करतील, असा सूर मनसेच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ११ हजार ९ इतके नोटा मतदान झाले होते.उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात एकूण २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथून महायुतीचे गजानन कीर्तिकर व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संजय निरुपम यांच्यात मुख्य लढत होणार आहे. २००९ व २०१४ साली येथून लोकसभा निवडणूक लढवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा राज्यात कुठेही लोकसभा निवडणूक लढवत नाही. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पाठिंबा राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जाहीर केला आहे. राज्यात त्यांच्या विक्रमी सभा होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर ते टीकेचे आसूढ ओढत आहेत. राज्यात मनसेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला असला तरी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संजय निरुपम हे मनसेचे कट्टर शत्रू आहेत.मनसेला आघाडीत समाविष्ट करण्यास निरुपम यांनी कडाडून विरोध केला होता. मनसे आणि निरुपम यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसेचा एकही कार्यकर्ता त्याचे काम करणार नाहीत, अशी ठाम भूमिका मनसेचे सरचिटणीस बाळा नांदगावकर यांनी नुकतीच जाहीर केली होती.>अशी आहे मनसेची ताकद२००९ साली मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना १,२३,८८५ इतकी मते मिळाली होती. २०१४ साली मनसेच्या महेश मांजरेकर यांना येथून ६६०८८ मते मिळाली होती. २०१७ च्या पालिका निवडणुकीत उत्तर पश्चिम मधील ४२ प्रभागांपैकी एकाही प्रभागात नगरसेवक निवडून आला नाही. या वेळी मनसेचे जास्त आमदार विधानसभेत दिसतील, असा विश्वास सूत्रांना आहे़
उत्तर पश्चिम मुंबईत करणार नोटांचा विक्रम?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 1:28 AM