मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा तलाव क्षेत्रात चार दिवस हजेरी लावली. यापैकी सर्वाधिक २१० मिमी. पाऊस विहार तलावात झाला आहे. या खालोखाल तुळशी तलावात १७८ मिमी., मोडक सागर १०२ मिमी., मध्य वैतरणा ६२ मिमी., तानसा ५९ मिमी., भातसा २९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर, अप्पर वैतरणा तलावात मात्र पाऊस झालेला नाही. मात्र या थोड्याशा पावसानेही तलाव क्षेत्रातील जलसाठ्यात वाढ केली आहे.
महापालिकेमार्फत दररोज मुंबईत ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. १७ ते २० मे २०२१ या काळात अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या चक्रीवादळामुळे तलाव क्षेत्रात पावसाची नोंद झाली. मुंबईचा पाणीपुरवठा वर्षभर सुरळीत राहण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष मीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. सध्या तलावामध्ये एकूण ६५ दिवसांचा जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा २७ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.
चक्रीवादळाच्या काळात पाच दिवसात सर्वाधिक पाऊस विहार आणि तुळशीत तलावात पडला. हे दोन्ही तलाव मुंबईत स्थित असून सर्वात लहान तलाव आहेत. त्यापाठोपाठ मोडक सागर या तलावामध्ये १०२ मिलीमीटर पाऊस पडला. या तलावातून दररोज सरासरी दररोज ५५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तर तानसा तलावात ५९ मिलीमीटर नोंद झाली आहे.