मुंबई : कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात खरेदी आणि लॉजिस्टिकविषयक समस्या असतानाही प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राने एप्रिल महिन्यात 52 कोटी रुपयांच्या औषधांची विक्रमी विक्री केली असून, मार्च महिन्यात या औषधांची 42 कोटी रुपयांची विक्री झाली होती, तर एप्रिल 2019 मध्ये ही विक्री 17 कोटी इतकी होती.
आज जेव्हा संपूर्ण देश कोविड-19 च्या आव्हानांचा सामना करत आहे, अशावेळी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांना मोठी मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी जनऔषधी केंद्रे तत्पर असून एप्रिल महिन्यात त्यांनी जनतेला 52 कोटी रुपये किमंतीच्या स्वस्त आणि उत्तम दर्जाच्या औषधांची विक्री केली आहे. बाजारातील औषधांपेक्षा कमी किमतीची ही औषधे असल्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांच्या सुमारे 300 कोटी रुपयांची बचत झाली आहे. जनऔषधी केंद्रांवर मिळणारी औषधे सरासरी किमतींपेक्षा 50 ते 90 टक्के स्वस्त असतात.