Join us

अवघ्या पाच दिवसांचा कादंबरी लेखनाचा विक्रम...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:06 AM

मनाली काळे यांच्या लेखणीची करामतराज चिंचणकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाट्यलेखिका, अभिनेत्री, भाषांतरकार म्हणून कार्यरत असलेल्या मनाली ...

मनाली काळे यांच्या लेखणीची करामत

राज चिंचणकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नाट्यलेखिका, अभिनेत्री, भाषांतरकार म्हणून कार्यरत असलेल्या मनाली काळे यांनी लिहिलेल्या कादंबरीला, कमीत कमी दिवसांत लिहिली गेलेली मोठी कादंबरी, असा बहुमान प्राप्त झाला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.

‘हाऊ शूड धिस लव्हस्टोरी एन्ड’ या त्यांच्या इंग्रजी कादंबरीला हा मान मिळाला आहे. मनाली काळे यांनी सदर कादंबरी लिहिण्यासाठी लेखणी उचलली, तेव्हा यातून एक विक्रम घडणार आहे; हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. मात्र त्यांच्या लेखणीच्या करामतीतून हा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला आहे. विशेष म्हणजे, केवळ पाच दिवसांत लिहिलेल्या २९८ पानांच्या या कादंबरीचे त्यांनी तीन शेवट लिहिले आहेत.

केवळ पाच दिवसांत ही कादंबरी लिहून पूर्ण झाल्यावर, त्यांचे मार्गदर्शक अंशुमन पात्रो यांनी, हा लेखनाचा विक्रम असू शकतो, असे त्यांना सुचविले. त्यानुसार मनाली काळे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे अर्ज पाठवला आणि केवळ दहा दिवसांतच त्यांच्याकडून सदर रेकॉर्ड झाल्याचे उत्तर त्यांना मिळाले. सगळ्यात मोठी कादंबरी कमीत कमी दिवसांत लिहिणारी पहिली भारतीय लेखिका, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. या विक्रमानंतर त्यांनी एशिया बुक ऑफ रेकॉर्डकडेही त्यासंबंधीचा अर्ज पाठवला आणि त्यांच्याकडूनही सदर रेकॉर्ड मान्य झाल्याचे त्यांना कळविण्यात आले. त्यामुळे संपूर्ण आशिया खंडातून, सर्वांत मोठी कादंबरी कमीत कमी दिवसांत लिहिणारी लेखिका म्हणून 'ग्रँड मास्टर' ही पदवी त्यांना एशिया बुक ऑफ रेकॉर्डकडून बहाल करण्यात आली आहे.

- मनात आले ते लिहीत गेले

जेव्हा या रेकॉर्डचे मानपत्र आणि स्मृतिचिन्ह माझ्या घरी आले; तेव्हाचा क्षण अविस्मरणीय होता. एरव्ही लेखन करताना माझी बरीच चालढकल असायची; परंतु या कादंबरीच्या बाबतीत तसे काही झाले नाही. वास्तविक माझे लेखन तांत्रिक पद्धतीचे असते; परंतु पाच दिवसांत कादंबरी लिहिताना हे तंत्र बाजूला ठेवून फक्त मनात जे येत गेले, ते मी लिहीत गेले.

- मनाली काळे (लेखिका)

-------------------------------------------------------------------------------------------------------------