बोगस तिकीट तपासनिसाला केले गजाआड, दिव्यांग डब्यातून प्रवास करणा-यांकडून वर्षभर करत होता वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:39 AM2017-09-09T03:39:16+5:302017-09-09T03:39:33+5:30
दिव्यांग डब्यातून प्रवास करणा-या प्रवाशांकडून कोट्यवधींची वसुली करणा-याला अखेर अटक करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
मुंबई : दिव्यांग डब्यातून प्रवास करणा-या प्रवाशांकडून कोट्यवधींची वसुली करणा-याला अखेर अटक करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकाश फडकाले (४६) असे या बोगस तिकीट तपासनिसाचे नाव आहे. आरोपीविरुद्ध वसई रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून, याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून दिव्यांग डब्यातून बोगस तिकीट तपासनीस वसुली करत होता. गेल्या वर्षभरापासून आरोपी प्रकाश फडकाले हा प्रवाशांना कारवाईचा धाक दाखवून वसुली करत होता. पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाने याबाबत खात्री करण्यासाठी विशेष पथक नेमले. पथकातील एक रेल्वे अधिकारी नालासोपारा येथून लोकलच्या दिव्यांग डब्यात चढला. या लोकलमध्ये आरोपीदेखील तिकीट तपासनिसाचा गणवेश घालून दिव्यांग डब्यात उपस्थित होता. मालाड स्थानकापूर्वी आरोपीने संशयास्पद हालचाली करण्यास सुरुवात केली. या वेळी दक्षता विभागाने आरोपीला मालाड स्थानकात उतरविले. रेल्वे अधिकाºयाने आरोपीची झाडाझडती घेतली असता, प्रकाशने तिकीट तपासनीस नसल्याची कबुली दिली.
मूळचा गोरेगावमधील असलेला आरोपी प्रकाश हा टेम्पोचालक आहे. सुमारे वर्षभरापासून आरोपी दिव्यांग डब्यातून प्रवास करणाºया प्रवाशांकडून बेकायदा वसुली करत होता. याबाबत वसई रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.