मुंबई - गेल्या काही काळापासून शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घणाघाती आरोपांची राळ उडवणारे भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात तुंबळ शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेमधून किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच कोण किरीट सोमय्या, त्यांना विचारतो कोण, असा उल्लेख करत किरिट सोमय्या लवकरच तुरुंगात जातील, असा इशाराही दिला.
संजय राऊत म्हणाले की, दुसऱ्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देता, आता तुम्ही तुरुंगात जा. मी तुम्हाला काय सांगितलं आहे की, भाजपाचे साडेतीन नेते तुरुंगामध्ये जाणार आहेत. मी ती नावे काल सांगेन, अशी तुमची अपेक्षा होती. जसजसे ती आतमध्ये जातील, तसतसे तुम्ही मोजत जा. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या हे बाप-बेटे नक्कीच तुरुंगात जाणार. बाप-बेटे १००% जेलमध्ये जात आहेत, असे संकेतही संजय राऊत यांनी दिले.
क्रिमिनल सिंडिकेट, ईडी च्या नावाने धमक्या हे सगळ्याचा आता भांडाफोड होईल. मी आव्हान दिले होते की, ते १९ बंगले दाखवा, पण ते यांनी दाखवलेत का? अर्जुन खोतकरांना कसा आणि किती त्रास दिला हे मला माहिती आहे. या किरीट सोमय्यांनी मुंबईतील बिल्डर, व्यापारी यांना ईडीची धमकी देऊन त्यांच्याकडून शेकडो कोटी उकळलेत. त्यातले किती टक्के ईडीकडे गेले, हे ते खासगीत सांगत असातात, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ८ जेव्हीपीडी स्कीम सुजित नवाब नावाचा प्लॉट किरिट सोमय्या आणि अमित देसाई यांनी ईडीची धमकी देऊन हा १०० कोटी रुपयांचा प्लॉट मातीमोल भावाने खरेदी केला. हा प्लॉट किरीट सोमय्यांचे मित्र अमित देसाईंच्या नावावर करून घेतला. त्यातले १५ कोटी रुपये किरीट सोमय्यांनी ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला दिले. हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे. नाहीतर त्या अधिकाऱ्याचे नाव मी घेईन.
दरम्यान, त्या १९ बंगल्यांबाबत विचारले असता संजय राऊत संतापले. ते म्हणाले, छोडो यार, कोण किरीट सोमय्या, कसले पुरावे. किरीट सोमया हे काय इन्व्हेस्टिगेशन अॅथॉरिटी आहेत काय. मी सांगतोय कारण मी जबाबदार माणूस आहे. भाजपाने सांगावे की किरीट सोमय्या हे जबाबदार माणूस आहेत म्हणून. किरीट सोमय्या यांनी तिथे बंगले आहेत की नाही ते सांगावं, मला कागदबिगद आहेत वगैरे सांगू नका. तुम्हीही सोमय्यांच्या नादी लागू नका. ते लवकरच जेलमध्ये जातील. १९ बंगले कुठे आहेत. देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत. संजय राऊत यांची बेनामी संपत्ती कुठे आहे. भावना गवळी, आनंद अडसूळ यांना त्रास का दिला जातोय. एक दूधवाला महाराष्ट्रात येतो. सरकामधील लोकांचे पैसे गुंतवतो आणि सात हजार कोटींचा मालक बनतो. अमोल काळे कोण आहे, हे स्पष्ट करा. सुरुवात तुम्ही केली आहे. शेवट आम्ही करणार, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.