एनआयएकडून पडताळणी सुरू; पब्ज, बार, बुकींसह इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्फोटक कारप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या कार्यालयातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एक डायरी जप्त केली आहे. २०० पानांच्या या डायरीतून त्याचे आर्थिक व्यवहार व वसुलीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. डायरीत पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. कोडवर्डमध्ये वसुलीबद्दल तपशील नमूद असल्याचे अधिकऱ्यांनी सांगितले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानापासून ४०० मीटर अंतरावर सापडलेल्या स्फोटक कारप्रकरणी एनआयएने सीआययूचा प्रमुख सचिन वाझेला १३ मार्चला अटक केली. त्यानंतर पोलीस मुख्यालयातील कार्यालयाची झाडाझडती घेऊन संगणक, आयपॉडसह अनेक साहित्य जप्त केले. त्यामध्ये ही डायरी त्यांच्या हाती लागली आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब वाझे ठेवत होता. या डायरीत कोणत्या दिवशी कोणाला भेटायचे हे नमूद करण्यात आले आहे. तसेच मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्कापार्लरची यादीही आहे. ज्यांनी पैसे दिले त्याची नोंद आहे.
लाखाच्या नोंदीसाठी एल, तर हजाराच्या नोंदीसाठी के हे अक्षर वापरले आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशांचे वाटप नियमित होत होते. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. त्यामुळे तो कोणाकडून किती रक्कम वसूल करीत होता, याचे गुपित उघडकीस येण्याची शक्यता आहे.
* ईडीकडूनही तपास होणार ?
वाझेच्या अटकेनंतर एनआयएने पाच आलिशान गाड्या, साडेपाच लाखांची रोकड, पैसे मोजण्याची मशीन जप्त केली. तसेच त्यांच्या हाती संशयित डायरीही लागली आहे. त्यातून आर्थिक उलाढाली स्पष्ट होत असून, याचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) केला जण्याची शक्यता आहे.
* हुक्का पार्लरमधून ११ कोटींची वसुली
सचिन वाझेकडे वसुलीचे काम होते, ती तो रक्कम कोणाला देत होता, याबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मुंबईतील हुक्का पार्लरमधून ११ कोटींची वसुली केल्याचे डायरीत नमूद असल्याचे समजते.
-------------