Central Railway: फुकट्या प्रवाशांकडून आठ महिन्यात १२३.३१ कोटी रुपयांची वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 05:29 AM2021-12-02T05:29:19+5:302021-12-02T05:30:16+5:30
Central Railway: मध्य रेल्वेच्या स्पेशल टीमने विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली असून, या प्रवाशांकडून आठ महिन्यात १२३.३१ कोटी रुपयांची वसुली केली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या स्पेशल टीमने विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली असून, या प्रवाशांकडून आठ महिन्यात १२३.३१ कोटी रुपयांची वसुली केली आहे.
अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या धडक मोहिमेमुळे १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या कालावधीत २०.६८ लाख प्रकरणांमधून १२३.३१ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. नोव्हेंबर-२०२१ मध्ये, बुक न केलेल्या सामानासह अनधिकृत/अनियमित प्रवासाची ४.५२ लाख प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून ३० कोटी रुपये वसूल करण्यात आले.
तर मध्य रेल्वेने कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून रेल्वेला मोठा महसूल प्राप्त झाला आहे. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या कालावधीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोरोना नियमांचे पालन करीत नसलेल्या एकूण २४,९४४ व्यक्तींना शोधून त्यांना दंड ठोठावला आणि ४१.२८ लाख रुपयांची रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली.
भाडे-व्यतिरिक्त महसुलात मध्य रेल्वे क्रमांक एक
मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर-२०२१ या कालावधीत भाडे-व्यतिरिक्त महसूल म्हणून रु. १४.५७ कोटींचे योगदान दिले असून, ते सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण ३५० टक्के अधिक आहे. भाडे-व्यतिरिक्त महसुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक स्थानकांवर डिजिटल क्लोक रूम, ॲप आधारित व्हील चेअर सुविधा, डब्यांच्या आत जाहिराती, लोकल ट्रेन, होर्डिंग साइट उत्पन्नाचा समावेश आहे.