ठाण्यात तळीरामांकडून दोन लाखांची वसूली
By admin | Published: January 1, 2015 11:26 PM2015-01-01T23:26:30+5:302015-01-01T23:26:30+5:30
मद्य पिऊन जाणाऱ्यांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ३१ डिसेंबर २०१४ या एकाच दिवसात दोन लाख ३३ हजारांचा दंड वसूल केला आहे.
ठाणे: सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्य पिऊन जाणाऱ्यांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ३१ डिसेंबर २०१४ या एकाच दिवसात दोन लाख ३३ हजारांचा दंड वसूल केला आहे. मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत ६२० चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या २२ युनिटद्वारे ६६ पथकांनी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये २२ ब्रीथ अॅनलायझरच्या सहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी ३० डिसेंबर रोजी १५२ तर ३१ डिसेंबर रोजी ६२० मद्यपी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक तळीराम कल्याणमध्ये पकडले गेले. ३० डिसेंबर रोजी १८ तर ३१ डिसेंबर रोजी ७१ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त पुलकेशिन मठाधिकारी यांनी दिली.
त्यापाठोपाठ कळवा ६०, कापूरबावडीमध्ये ४२ मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ठाणेनगर १७, कोपरी १३, नौपाडा ३४, वागळे इस्टेट २४, राबोडी ३० , कासारवडवली ३८ आणि वर्तकनगरमध्ये २६ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेकडून सांगण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, भिवंडी आणि वागळे इस्टेट या परिमंडळामध्ये ही मोहीम राबविण्यात आली.
मुंबईचा तरुण
वरपडी नदीत बुडाला
शहापूर तालुक्यातील आजा पर्वताच्या पायथ्यशी असलेल्या डेहणे गावानजीक थर्टी फर्स्ट साजरा करण्यास आलेले मुंबईतील ११ तरुण व चार तरुणींपैकी ५ तरुण येथील वरपडी नदीत आंघोळीसाठी गेले असता यातील नितेश नायर (३०) या मालाड येथील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. या तरुणास डोळखांब शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद ढेरे यांनी मृत घोषित करून उत्तरीय तपासणीसाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. नगरहून डेहणे मार्गाने मुंबईकडे निघालेले हे तरुण गिर्यारोहक असल्याचे पोलीस हवालदार कामडी यांनी सांगितले.
रिक्षा चालकाने पकडली पोलिसाची कॉलर
४शहरात नाकाबंदीच्या काळात रिक्षा अडविल्याचा राग येऊन व्यसनाधीन रिक्षाचालकाने पोलिसाची कॉलर पकडल्याची घटना थर्टी फर्स्टच्या रात्री २ वाजताच्या सुमारास घडली.
४२०१४ च्या वर्षाअखेर निमित्ताने शहरात बुधवारी रात्री नाकेबंदी पुकारली होती. जकातनाका राजीवगांधी उड्डाण पुलाखाली सोमनाथ महादू पाटील हे वाहतूक पोलीस कर्तव्यावर असताना त्यानी रिक्षा अडविली.
४त्याचा राग येऊन रिक्षाचालक मेहबूब अमीन चौधरी या रिक्षाचालकाने गैरवर्तन करून पाटील यांची कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी केली. त्यावेळी रिक्षाचालकाने मादक द्रव्याचे व्यसन केले होते, अशी तक्रार पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
एफडीएच्या ठाणे-कोकणात २३ ठिकाणी धाडी
थर्टी फर्स्टच्या रात्री अन्न व औषध विभागाने (एफडीए) ठाणे जिल्ह्यासह आणि कोकणात २३ ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीत वेगवेगळ्या ठिकाणावरून तयार अन्नपदार्थांसह तेल आणि विदेशी दारूचे एकूण २९ नमुने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ३१ डिसेंबरला नागरिकांची ओढ हॉटेल्स्कडे अधिक असते. याचदरम्यान, भेसळ होण्याची शक्यता असते.त्यामुळे नागरिकांना काही अपाय होऊ नये म्हणून छोट्या-मोठ्या सर्व हॉटेल्स मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या. तरीसुद्धी नूतन वर्षाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून, ठाणे अन्न व औषध प्रशासन (कोकण) विभागाने विशेष मोहिम हाती घेऊन ठाणे आणि रायगड येथील २३ ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून तयार अन्नपदार्थाचे १५, विदेशी मद्याचे १३ आणि एक तेलाचे असे २९ नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते मुंबईत तपासणीस पाठविण्यात आले आहेत.
शहापूर येथे वादात एकाची हत्या; एक गंभीर
आटगाव येथील संघवी बिल्डर्समध्ये काम करणारे तीन मजूर रात्री ११:०० वाजताच्या सुमारास थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी आसनगांव - वालशेत गावाच्या हद्दीत दारू पिताना झालेल्या वादातून तिघांपैकी अनू बरंमदास राठोड याने धारदार चॉपरने दोघा मित्रांवर वार केले. यामध्ये मांगेश नाजूक डोंगरे याचा मृत्यू झाला. तर उदार बिलाराम राठोड हा गंभीररित्या जखमी झाला आहे. खुनाच्या गुन्ह्याखाली अनू राठोड याला सोमवारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याणमध्ये १६१ जणांवर कारवाई
४कल्याण परिक्षेत्रात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६१ मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे. यात मद्यपी वाहनचालकांबरोबर प्रवास करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
४३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर कल्याण परिसरातील काटेमानिवली, दुर्गाडी चौक, पौर्णिमा चौक, पत्रीपूल, टाटा नाका, काटई नाका, घरडा सर्कल, कोपर ब्रीज या ठिकाणी वाहतूक शाखेच्या वतीने नाकाबंदी लावण्यात आली होती.
४रात्री ८ पासून सुरू झालेल्या कल्याण पश्चिम मध्ये ७१, पूर्वेतील कोळसेवाडी युनिट परिक्षेत्रात १६, खडकपाडा येथे १२, डोंबिवली पूर्वेकडे २२, मानपाडा हद्दीत २८,पश्चिमेकडील विष्णुनगर परिसरात १२ मद्यपी चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
४यंदा १६१ जणांवर कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी हा आकडा १०८ च्या आसपास होता.
कारवाईचे सत्र
४खडकपाडा वगळता इतर सर्वत्र ठिकाणी कारवाई साठी ब्रीथ अॅनालायझर यंत्रे उपलब्ध करण्यात आली होती.
४विशेष बाब म्हणजे मद्यपी वाहनचालकाच्या पाठीमागे अथवा त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्यांवर ही कलम १८८ अन्वये कारवाई केल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त सयाजी डुबल यांनी दिली.
४ मद्यपी वाहनचालकांच्या कारवाईत दुचाकी चालकांबरोबरच कारचालक, रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
डोंबिवलीत ड्रंक -ड्राइव्ह करणाऱ्या ६४ जणांवर कारवाई
मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या ६४ जणांवर डोंबिवली शहर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाइ केली आहे. ही मोहीम ३१ डिसेंबर रात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंत चालविण्यात आली होती.ज्या मद्यपीवाहनचालकांवर कारवाई करण्यात आली़ त्या सर्वांकडून प्रत्येकी २ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे शहर वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी सांगितले. डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड, एमआयडीसीसह स्टेशन रोड आदी मोक्याच्या ठिकाणांसह पश्चिमेकडील स्टेशन रोड, दिनदयाळ रोड, उड्डाण पूल आदी ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.
भार्इंदरमध्ये ४९ तळीरामांसह २८५ जणांवर कारवाई
शहरातील नाकाबंदीत सापडलेल्या ४९ तळीराम वाहनचालकांसह विविध गुन्ह्यांत २८५ जणांवर ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. डिजेचा आवाज चढवून नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ पार्ट्या सुरु ठेवल्याप्रकरणी डझनभर बार व रिसॉर्टवर गुन्हे दाखल केल्याचे उपअधिक्षक सुहास बावचे यांनी सांगितले.
वर्षाचा शेवटचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी गृहविभागाने पहाटे ५.३० वा. च्या वेळेचे बंधन घातले होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचाय््राांसह वाहतुक कर्मचारी, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक व मुख्यालयातील कर्मचाय््राांना तैनात करण्यात आले होते. शिवाय पोलिस वर्दीसह साध्या वेशातील पथकांद्वारेही धांगडधिंगाण्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.
पोलिसांच्या विशेष बंदोबस्तामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी काशिमिरा, मीरारोड व उत्तन-सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे डझनभर बार व रिसॉर्टमध्ये नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ पार्ट्या सुरु ठेवण्यासह डिजेचा आवाज प्रमाणित डेसीबलपेक्षा जास्त चढविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यात उत्तन येथील राजकीय हितसंबंधातील सिल्वाडोर व ला-सिमर या रिसॉर्टचा समावेश आहे. शिवाय वाहतूक शाखेने शहरातील विविध भागांत लावलेल्या नाकाबंदीत सापडलेल्या ४९ तळीराम वाहन चालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह कायद्यान्वये कारवाई केली आहे. तसेच मोटरवाहन कायद्यान्वये २३६ वाहन चालकांवर विविध गुन्हे दाखल केले आहेत.
बिलाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने बिअरची बाटली घातली डोक्यात
डोंबिवली : मद्यप्राशन करून थर्टी फर्स्ट साजरा केल्यानंतर बिलाची मागणी केल्याचा राग आल्याने आणि जगदीश शेट्टी याला तो पैसे देत नाही या कारणाने बियरची बाटली त्याच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. फिर्यादी सुधीर शेट्टी याने दिलेल्या तक्रारीनुसार विलास भुजंग, भगवान भुजंग, रवी आणि यांच्यासह अन्य साथीदारांवर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच शेट्टी यानेही धक्काबुक्की-मारहाण केल्याचे भुजंग यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणी दोघांनीही या संदर्भात परस्परविरोधी तक्रार दाखल केल्याचे पोलीसांनी सांगितले.
शेलार नाका परिसरातील स्वीट ड्रीम आॅर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. वेटरने भुजंग यांच्याकडे बील मद्यप्राशन झाल्यावर बील मागितले असता, बील कसले मागतो असे सांगत भगवान भुजंग याने हातावर काचेचा ग्लास मारला, तसेच जगदीश शेट्टी याला मी आरटीआय चा कार्यकर्ता असून पैसे कसले मागतोस, तुझा बार बंद करीन, उलट तूच मला दरमहा २० हजार रुपये दे अशी मागणी केली, मात्र जगदीशने त्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
अन्य साथीदारांनीही त्यास ठोशाबुक्कयांनी मारून हॉटेलातील खुर्च्या टेबल सामानही खाली पाडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जातांना विलास याने काऊंटरच्या शोकेसमधील बिअरची बाटली फोडत साक्षीदार रुपीत शेट्टी याच्या हातावर वार करून त्यांनी गल्ल्यातील ३६ हजार रुपये काढून नेल्याचे म्हटले, त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भुजंग यानेही शेट्टी विरोधात याच पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या परस्परविरोधी तक्रारीचा पुढील तपास सुरू आहे.
1वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांवर नेहमी कारवाई केली जाते. मात्र, नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळणाऱ्या ५ हजार चालकांनाही पोलिसांनी थांबवून गुलाब आणि पॉकेट कॅलेंडरचे वाटप केले. तसेच यावेळी त्यांना नूतन वर्षातही अशाप्रकारेच नियमाचे पालन करण्याबाबत आवाहन केले. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या अनोख्या उपक्रमाचे चालकांनीही कौतूक केले.
2नुतन वर्ष अपघात विरहीत जावे,आणि वाहतुकीचे नियम सर्वांनी तंतोतंत पाळण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी रात्री ठाण्यातील तीन हात नाका, कॅडबरी, नितीन कंपनी जंक्शन, कापूरबावडी, माजीवडा, टॉवर नाका, कोपरी पूर्व आदी गर्दीच्या ठिकाणी रात्री ठाणे वाहतुक शाखेच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवला. यावेळी तब्बल ५ हजार दुचाकी, चारचाकी आणि थ्री व्हिलर चालकांना याचे गुलाब आणि पॉकेट कॅलेंडर देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच नियम पाळण्याबाबत सांगण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिली.