मनोहर कुंभेजकरमुंबई-- महाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी.चा समुद्र किनारा लाभलेला आहे. विशेषतः २६/११ ला मुंबईवर आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे फार मोठी वित्त्तीय व जीवित हानी झालेली होती.
मुंबईच्या ११० कि.मी. व महाराष्ट्र सागरी किनारी आतंकवादी हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी व महाराष्ट्राचे सागरी किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी ५०० सुशिक्षीत मच्छिमार तरुणांची भरती करुन त्यांना कमांडो व हायस्पीड गस्ती नौकांचे प्रशिक्षण देण्याची मागणीसाठी शिवसेना आग्रही आहे.
सदर आग्रही मागणी आज शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचेे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी माजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचे सागरी किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी ५०० सुशिक्षीत मच्छिमार तरुणांची भरती करुन त्यांना कमांडो व हायस्पीड गस्ती नौकांचे प्रशिक्षण देण्यासाठी मागणी केली होती. तत्कालीन शासनाने ही मागणी मंजूर करुन गृह विभागाने अंमलबजावणी करावी असे निदेशही दिले होते, त्यानुषंगाने गडचिरोली भागातील तरुणांची भरती करण्यात आली व ५३ हायस्पीडच्या गस्ती नौका खरेदी करण्यात आल्या. परंतू प्रशिक्षीत पोलिसांची भरती न केली गेल्यामुळे मुंबईच्या गिरगांव चौपाटी येथे हायस्पीड गस्ती नौकेवर काम करणारे दोन पोलीस समुद्रात पडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता याकडे देखिल आमदार प्रभू यांनी लक्ष वेधले होते.
दि.२६ नोव्हेंबर २००८ साली आतंकवादी हल्ल्याच्या वेळी खरेदी केलेल्या यासर्व ५३ हायस्पीडच्या नौका भंगारात निघाल्या आहेत.सद्यःस्थितीत मुंबई व कोकण सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी २४ हजार मच्छिमार नौकांवर एक लाख मच्छिमार खलाशी पोलीसांचे डोळे व कान असल्याने खऱ्या अर्थाने कोकण किनारपट्टी सुरक्षित ठेवीत आहेत व मुंबई व महाराष्ट्राच्या पोलीसांना संपूर्ण सहकार्य करीत आहेत.
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या निवेदनातील मागणीनुसार मुंबईच्या सुरक्षितेबाबत मच्छिमारांच्या तज्ञ मंडळींची सुरक्षा समिती स्थापन करुन प्रत्येक महिन्याला आढावा बैठक आपल्या दालनात घ्यावी व या समितीत नेव्ही, कोस्टगार्ड, आयुक्त मत्स्यव्यवसाय, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व चेअरमन, मुंबई पोर्ट स्ट्रस्ट, प्रधान सचिव, गृहविभाग व आयुक्त, सागरी पोलीस परिमंडळ-१ यांचा समावेश करावा. आणि अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिलेल्या निवेदनातील मागण्यांच्या अनुषंगाने निर्णयात्मक कार्यवाही करण्यात यावी,अशी आग्रही मागणी आमदार सुनिल प्रभु यांनी शेवटी मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे आपल्या पत्राद्वारे केली आहे.