Join us

संचमान्यता पूर्ण... झेडपीच्या ५४ तर राज्यातील खासगी शाळांमध्ये ३० हजार शिक्षकांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:48 PM

जिल्हा परिषदेच्या ५४ हजार १९३ शाळांची संचमान्यता प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या ५४ हजार १९३ शाळांची, तर सुमारे १४ हजार खासगी शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांची भरती करण्याच्या दृष्टीने संचमान्यतेची प्रक्रिया सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित संस्थांमध्ये अंदाजे ६७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० मुलांमागे एक शिक्षक बंधनकारक आहे; पण मागील साडेपाच वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने हा निकष डावलला गेला आहे. या पार्श्वभूमीवर एकूण रिक्तपदांच्या ८० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पण, सध्या पहिल्या टप्प्यात पदे भरली जाणार आहेत, त्याचा कृती आराखडा शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे.

राज्यातील २०१७च्या शिक्षक भरतीतील १९६ व्यवस्थापनाच्या शाळांतील ७६३ रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रिक्त पदांवर ७६३ जागांसाठी एकूण ५ हजार ५३५ उमेदवारांची प्राधान्यक्रमानुसार संस्थांकडे शिफारस करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने या शाळांमध्ये मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावी या गटातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाने पाठविलेल्या दहा उमेदवारांच्या मुलाखतीतून संस्थांना एकाची निवड करावी लागणार आहे. या उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही शाळांना ११ ऑगस्टपर्यंत पार पाडावी लागणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.

राज्यातील शाळा     राज्यात एकूण १ लाख ४ हजार ८७८ शाळा आहेत. त्यातील ६५ हजार ३२० शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत, तर ३९ हजार ५५८ खासगी शाळा आहेत.     ज्यातील २०१७च्या शिक्षक भरतीतील १९६ व्यवस्थापनाच्या शाळांतील ७६३ रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा     स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित संस्थांमध्ये अंदाजे ६७ हजार शिक्षकांची पदे रिक्त

टॅग्स :शिक्षकशाळा