Join us

३० हजार शिक्षकांची भरती; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 9:05 AM

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात  नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची  भरती होणार असून त्यांची नावे पवित्र पोर्टलवर येतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात  नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची  भरती होणार असून त्यांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत  दिली. शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक भरतीबाबत  विरोधी पक्ष नेते अजित पवार, दिलीप वळसे- पाटील, धनंजय मुंडे, रोहित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. देवराव होळी, हरीभाऊ बागडे  आदींनी प्रश्न विचारला होता.

केसरकर म्हणाले,  कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र, फेब्रुवारी ते मार्च २०२३ मध्ये टेट परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास ३०  हजार शिक्षक भरती करणार आहे. शिक्षकांचा पदभरतीसाठी टेट परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणर आहे. सध्या ३० हजारपैकी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी आम्हाला मिळाली आहे. उर्वरित पदेही त्यानंतर भरली जातील.

६ वर्षांनंतर टेट परीक्षा

२०१७ नंतर आता २०२३ मध्ये टेट परीक्षा घेण्यात येत आहे.  शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी मिळाल्याने ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे राज्य सरकारचे  धोरण आहे. टेट परीक्षेत दोषी ठरलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर  नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही  केसरकर यांनी यावेळी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शिक्षकदीपक केसरकर