Join us

३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच

By दीपक भातुसे | Published: June 08, 2024 11:58 AM

घोषणा २१,६७८ जागांची, भरल्या फक्त ११,०८५ जागा

मुंबई : राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वर्षभरापूर्वी केली होती. मात्र, यातील निम्म्याही जागा आतापर्यंत भरलेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 

जानेवारी २०२३ मध्ये राज्यात ३० हजार शिक्षकांची भरत करण्याची घोषणा केल्यानंतर शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचीप्रक्रिया राबवली गेली. २१,६७८ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यात मुलाखतीशिवाय १६,७९९ व मुलाखतीसह ४,८७९ पदांचा समावेश होता. त्यातील मुलाखतीशिवाय भरवयाच्या जागांपैकी ११,०८५ उमेदवारांची गुणवत्ता यादी घोषणेनंतर जवळपास एका वर्षाने म्हणजेच २५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करून या शिक्षकांची शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली.

आचारसंहितेचा अडसर आला का?मुलाखती शिवाय केलेल्या या पदांच्या भरतीनंतर मुलाखतीच्या भरतीप्रक्रियेसंदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता  लागू झाली आणि शिक्षण भरती ठप्प झाली. आचारसंहितेची मुदत संपल्यानंतर उर्वरित पदांची भरती करण्याची घोषणा शिक्षण विभागाने मागील महिन्यात केली होती. 

लोकसभेची आचारसंहिता तर संपली मात्र राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू आहे. आधीच जानेवारी २०२३ मध्ये शिक्षक भरती जाहीर करूनही शिक्षण विभागाने ती जलदगतीने पूर्ण केली नाही. त्यानंतर आचारसंहितेच्या कचाट्यात ही भरती अडकल्याने शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेले लाखो उमेदवार निराशेच्या गर्तेत गेले आहेत. 

शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त काय म्हणाले?यासंदर्भात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला असता आचारसंहितेमुळे त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल डायव्हर्ट केलेले होते.

टॅग्स :शिक्षक