नोकऱ्यांसाठी सूचनांचीच भरती; जि.प.च्या जागांचा मुहूर्त कधी? उमेदवारांमध्ये कमालीची अस्वस्थता

By दीपक भातुसे | Published: April 15, 2023 08:05 AM2023-04-15T08:05:49+5:302023-04-15T08:06:01+5:30

मागील चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद भरती प्रक्रिया मंत्रालयातून जिल्हा परिषदांना केल्या जाणाऱ्या सूचनांच्या पलीकडे जात नसल्याचे दिसून येत आहे.

Recruitment of job vacancies When is the deadline for GP seats Extreme uneasiness among the candidates | नोकऱ्यांसाठी सूचनांचीच भरती; जि.प.च्या जागांचा मुहूर्त कधी? उमेदवारांमध्ये कमालीची अस्वस्थता

नोकऱ्यांसाठी सूचनांचीच भरती; जि.प.च्या जागांचा मुहूर्त कधी? उमेदवारांमध्ये कमालीची अस्वस्थता

googlenewsNext

मुंबई :

मागील चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद भरती प्रक्रिया मंत्रालयातून जिल्हा परिषदांना केल्या जाणाऱ्या सूचनांच्या पलीकडे जात नसल्याचे दिसून येत आहे. लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पार पाडण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारकडून अद्यापि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले नाही. अलीकडेच १२ एप्रिलला ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून त्यात भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत.

जिल्हा परिषदांची भरती परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यानुसार शासन स्तरावर भरतीसाठी आयबीपीएस कंपनीसोबत सामंजस्य करार अंतिम करण्यात आला आहे. या करारावर कंपनीतर्फे स्वाक्षरी झाली असून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी हा करार विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आला आहे. त्यावर स्वाक्षऱ्या होऊन येत्या आठवड्याभरात करार करण्याची कार्यवाही पूर्ण होईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदांमधील भरतीसाठी “ॲप्लिकेशन पोर्टल” विकसित करण्याचे काम आयबीपीएस कंपनीच्या स्तरावर सुरू आहे. त्यासाठी लागणारा जाहिरातीचा नमुना, रिक्त पदांची आरक्षण प्रवर्गनिहाय माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता आदी माहिती आयबीपीएस कंपनीला पाठवाव्या, अशा सूचनाही या पत्रात आहेत.

चार वर्ष भरती झाली नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषदांनी शासन स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर भरतीसाठी झालेली कार्यवाही, पदभरतीबाबतची सद्यस्थिती व परीक्षा घेण्याबाबतचा ॲक्शन प्लॅन याची माहिती देणारी टिप्पणी कार्यालयाच्या दर्शनीभागात लावावी, शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करावी तसेच पदभरतीस सर्वोच्च प्राथमिकता देऊन याबाबतच्या कार्यावाहीस विलंब होणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यात दिल्या आहेत. 

१८,९३९ पदांसाठी भरती
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सरळ सेवा भरतीद्वारे ७५ हजार पदे भरायची असून १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी ही पदे भरायची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील १८,९३९ पदे भरली जाणार आहेत, असे या पत्राच्या सुरुवातीलाच म्हटले आहे. जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झाल्याचा उल्लेखही यात करण्यात आला आहे.

Web Title: Recruitment of job vacancies When is the deadline for GP seats Extreme uneasiness among the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.