Join us

"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 3:18 PM

मुंबईतील मेट्रो स्टेशनवर घडला प्रकार, मराठीत तिकीट मागितलं असता कर्मचाऱ्याने हिंदीत बोलण्यास सांगितल्याचा आरोप

मुंबई - मागील काही काळात मुंबईत मराठी आणि इतर भाषिक वाद उफाळून आला होता. मराठी माणसांना नोकरी नाही, मराठी माणसांना घर देणार नाही अशा प्रकारामुळे मराठी माणसांमध्ये संतापाची भावना होती. त्यातच मुंबईतील मेट्रो १ मध्ये तिकीट खिडकीवर बसलेल्या कर्मचाऱ्याला मराठी भाषा येत नाही हे समोर आले आहे. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी याचा जाब मेट्रो प्रशासनाला विचारला असून नोकर भरतीत स्थानिक भाषा येणे बंधनकारक असताना अशारितीने कर्मचारी भरती कशी केली जाते असा सवाल त्यांनी विचारला आहे.

मुंबईतील मेट्रो १ येथे प्रवास करताना हा अनुभव आल्यानंतर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला धारेवर धरले. मराठी भाषेला डावलून सर्रासपणे भरती केली जाते. मेट्रोसारखे प्रकल्प राज्यात आणताना इथल्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यायला हवे परंतु मेट्रो भरतीत बाहेरच्या राज्यातून येऊन इथं नोकरी मिळवतात. आपल्या राज्यात लाखो लोक बेरोजगार आहेत मात्र शासन परराज्यातील मुलांना नोकऱ्या देत आहेत. मेट्रो तिकीट काढायला महाराष्ट्रात मुले नाहीत का असा संतप्त सवाल या कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला. 

मराठी भाषा येत नसताना परराज्यातील लोकांना इथे शासनाच्या मेट्रो सारख्या प्रकल्पात नोकऱ्या दिल्या जातात. मेट्रोने राज्य शासनाला अंधारात ठेवून भरती केली आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आम्हा स्थानिकांना फसवत आहेत? आमच्या राज्याच्या प्रकल्पात या लोकांना नोकऱ्या कशा ? हे कर्मचारी तिकीट घेणाऱ्या ग्राहकांना भाषा शिकून या म्हणतात,  आपला मराठी माणूस दररोज तिकीट काढत असेल आणि हे सर्व सहन करतोय ? जाब विचारत नाही? नागपूर, पुणे, मुंबई मेट्रो ३, महामेट्रो, इकडे हेच केलेलं आहे. आम्ही तर काल सहज कार सोडून मुंबई मेट्रोने प्रवास करताना हे दिसून आले तेव्हा वाटलं आपण उत्तरप्रदेशात आहोत. असे किती लोकांनी आमचे रोजगार हिसकवले आहेत? असंही मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला. 

काय आहे व्हिडिओत?

३ मिनिटाच्या या व्हिडिओत मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते तिकिट काऊंटरवर असणाऱ्या मेट्रो कर्मचाऱ्याला मराठीत बोल असा आग्रह धरतात, तेव्हा "मुझे नही आता, कहासे बोलू, हम यूपीसे है..." असं म्हणतो. यावेळी मेट्रो प्रशासनातील अधिकाऱ्यांना मराठी भाषा येत नसताना इथे भरती होते कशी असा जाब विचारला. संबंधित कर्मचारी मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदी बोला असं बोलल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.

 

टॅग्स :मराठीमेट्रोनोकरी