पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची पाठ, तंत्रशिक्षण संचालनालयाकडून पुन्हा मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 06:35 AM2019-06-27T06:35:50+5:302019-06-27T06:36:06+5:30
पॉलिटेक्निकला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पॉलिटेक्निक प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करून मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : पॉलिटेक्निकला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पॉलिटेक्निक प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करून मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० जूनला सुरू झालेल्या दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशाची मुदत वाढवून ३ जुलै करण्यात आली आहे.
विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून यंदा या वर्षी ३० मे पासून अर्ज नोंदणी सुरू केली होती. मात्र, यास मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे तंत्रशिक्षण संचनालयाकडून ३ जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमांसाठी राज्यभरात ३८७ संस्थांमध्ये १ लाख ११ हजार जागा आहेत. त्यासाठी केवळ ६३ हजार ४०५ अर्ज नोंदणी झाली आहे. त्यातही ७,६८९ अर्ज भरले असले, तरी त्यांची अद्याप निश्चिती झाली नाही, तर ५५ हजार ७१६ अर्जांची निश्चिती झाली आहे.
पुढील वेळापत्रकातही बदल
तंत्रशिक्षण संचालनालयाने आॅनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्याने पुढील वेळापत्रकही लांबणार आहे. त्याबाबतही संचालनालयाने अंतिम गुणवत्ता यादीपर्यंतच्या तारखा जाहीर केल्या आहेत. नव्या वेळापत्रकानुसार ८ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. अंतिम गुणवत्ता यादीनंतर प्रवेशाची फेरी सुरू होईल.
अशा आहेत नवीन तारखा
अर्ज भरणे व निश्चिती- ३ जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
तात्पुरती गुणवत्ता यादी- ४ जुलै.
यादीवरील आक्षेप मुदत- ५ जुलै ते ६ जुलै सायं. ५ वाजेपर्यंत.
अंतिम गुणवत्ता यादी - ८ जुलै.