Join us

५० कोटी लीटर पाण्याचा पुनर्वापर शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:39 AM

मुंबई मनपाचा दावा : अडीचशे कोटी लीटर मलनिस्सारण पाण्यावर प्रक्रिया करणार

मुंबई : मुंबईतील मलनिस्सारण प्रकल्पांच्या माध्यमातून येत्या काळात सुमारे ५० कोटी लीटर पाण्याचा पुनर्वापर करता येणार आहे. मुंबई महापालिकेतील कार्यकारी अभियंता डॉ. अजित साळवी यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सोमवारी सुरू झालेल्या ‘इफाट इंडिया’ या प्रदर्शनात मनपाने या प्रकल्पांची माहिती देणारा स्टॉल उभारला आहे. त्या ठिकाणी ते बोलत होते.

साळवी म्हणाले की, मुंबईतील समुद्रात थेट जाणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करणाºया ८ प्रकल्पांची घोषणा या प्रदर्शनात करण्यात आली आहे. त्यातील कुलाबा येथील प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, २०१९पर्यंत ते पूर्ण होईल, तर वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा मालाड, भांडुप, घाटकोपर येथील प्रकल्पांची निविदा काढण्यात आली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर २५४ कोटी ४० लाख लीटर पाण्यावर रोज प्रक्रिया होणार आहे. त्यातील २० टक्के म्हणजे सुमारे ५० कोटी लीटरहून अधिक पाण्याचा पुनर्वापर होणार आहे.

पैकी वांद्रे येथील प्रकल्पाच्या ठिकाणी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पावर प्रशस्त उद्यान उभारण्यात येणार आहे. स्कायवॉकच्या आधारे त्या उद्यानात मुंबईकरांना रपेट मारता येईल. मात्र, प्रकल्प पाहण्यास त्यांना मनाई असेल.

याशिवाय समुद्रकिनारी एक उंच मनोराही उभारण्यात येणार आहे. या मनोºयाची उंची वांद्रे-वरळी सी-लिंकहून उंच असेल. त्यामुळे या मनोºयांतून मुंबईकरांना सी-लिंकसह विस्तीर्ण समुद्रकिनारा, वांद्रे किल्ला आणि माहिम किल्ला पाहता येईल.

बुधवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून, वांद्रे प्रकल्पाच्या ठिकाणी होणाºया सौंदर्यीकरणाची प्रतिकृती या ठिकाणी मांडण्यात आली आहे. प्रदर्शनात मोफत प्रवेश असल्याने मुंबईकरांना वांद्रे प्रकल्पाची भव्यता पाहता येईल, अशी माहिती साळवी यांनी दिली....असा होणार पुनर्वापरमुंबई मनपा मुंबईकरांना रोज ३८३ कोटी लीटर पाण्याचा पुरवठा करते. मात्र, त्यातील बहुतांश पाणी हे गाड्या धुण्यासाठी आणि शौचासाठी होणाºया फ्लशसाठी वाया जाते. परिणामी, मलनिस्सारण प्रकल्पातून पुनर्वापरासाठी निर्माण होणाºया पाण्याचा वापर रेल्वेला गाड्या धुण्यासाठी, मुंबईकरांना फ्लशसाठी, उद्योगांना वापरण्यासाठी, तसेच कुलाब्यातील संरक्षण विभागाला वापरासाठी देण्यात येणार आहे. या माध्यमातून मनपाचे सुमारे ५० कोटी ताजे पाणी वाचण्याची शक्यता डॉ. अजित साळवी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका बजेट २०१८पाणी