पर्यावरण संवर्धनसाठी पुस्तकाचा पुनर्वापर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:24 AM2020-12-11T04:24:59+5:302020-12-11T04:24:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे यासाठी अभ्यासक्रमात ‘पर्यावरण’ विषयाचा समावेश केला. पर्यावरण जतनासाठी विद्यार्थ्यांना ...

Recycling of books for environmental conservation. | पर्यावरण संवर्धनसाठी पुस्तकाचा पुनर्वापर..

पर्यावरण संवर्धनसाठी पुस्तकाचा पुनर्वापर..

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे यासाठी अभ्यासक्रमात ‘पर्यावरण’ विषयाचा समावेश केला. पर्यावरण जतनासाठी विद्यार्थ्यांना ‘थ्री-आर’ संकल्पना (रिड्यूस, रियुज, रिसायकल) शिकवली जाते. या संकल्पनेचा एक भाग म्हणून पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी २०१९-२०, २०२०-२१ शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके जमा करून त्याचे फेरवाटप करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरवले आहे. या उपक्रमातून कागदाची बचत होऊन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

समग्र शिक्षा योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी सरकारकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यासाठी दरवर्षी सुमारे २०० कोटींपेक्षा जास्त खर्च येतो. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची योग्यरीतीने जपणूक करतात, त्यांना सुस्थितीत ठेवतात, अशी पुस्तके जमा करून त्यांचा पुनर्वापर केल्यामुळे पुढील वर्षी त्याचे फेरवाटप करणे शक्य होईल. त्यामुळे ज्या शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना राबवली जाते, अशा शाळेतील मुलांना व पालकांना त्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. ही योजना ऐच्छिक असून, यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम शाळा सुरू झाल्यावर राबवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. हा उपक्रम पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यातून कागदाची बचत झाल्यामुळे झाडांचे संवर्धन होण्यास मदत होईल.

शालेेय विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणांतर्गत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये ‘वापर कमी करणे, पुन्हा वापर करणे, पुनर्वापर करणे’ ही संकल्पना मुलांना शिकविली जाते. या संकल्पनेची प्रत्यक्षात शिक्षण विभागाकडूनही अंमलबजावणी केली जावी यासाठी पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे. या उपक्रमातून किती पाठ्यपुस्तके जमा होतील, विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद कसा असेल, यावरून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Recycling of books for environmental conservation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.