मुंबई : कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे अनेक प्रयत्न यापूर्वी फसले आहेत़ परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे कचऱ्याचे वर्गीकरण न करताच प्रक्रिया करून वीजनिर्मिती करणे शक्य असल्याचा दावा पालिकेने बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला़ या आश्वासनंतरच देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला़पालिकेने देवनार डम्पिंग ग्राउंडवरील दोन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे़ प्रकल्पाची रचना करण्यासाठी टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्सची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे़ तसा प्रस्ताव स्थायीत बुधवारी मांडण्यात आला होता़ या सल्ल्यासाठी पालिका ५९ लाख रुपये मोजणार आहे़कचऱ्यापासून वीजनिर्मिती शक्य नसल्याचा अहवाल अनेक संस्थांनी दिला आहे़ तरीही या प्रकल्पासाठी सल्लागार का नेमण्यात येत आहे, असा सवाल समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला़ कचऱ्यात वीजनिर्मितीसाठी आवश्यक घटक नसल्यामुळे वीजनिर्मिती होत नाही, असे सर्व विरोधी पक्षांचे म्हणणे आहे़ (प्रतिनिधी)अशी वीजनिर्मिती शक्यठाणे, जळगाव, नागपूर या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत़ मात्र जगभरात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने वर्गीकरण न केलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणे आता शक्य आहे़ त्यानुसार दररोज दोन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचा पालिकेचा विचार आहे़ यामध्ये भविष्यात वाढ होऊ शकते, असे अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले़कचरा व्यवस्थापनासाठी योकोहामाचे सहकार्यमुंबईत प्रतिदिन सुमारे १० हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यापैकी सुमारे चार हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. जपानमधील योकोहामा शहरात निर्माण होणाऱ्या ५ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर पूर्णत: प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केले जाते. या अनुषंगाने मुंबई व योकोहामा दरम्यान मुंबई महापालिका मुख्यालयात कचरा व्यवस्थापन विषयावर विचारविनिमय करण्यात आला. योकोहामा शहराचे मुंबईतील वाणिज्य दूत यामामोटो यांनी महापालिका प्रशासनाची भेट घेतली. या वेळी उपायुक्त विजय बालमवार, योकोहामा शहराच्या संशोधक आणि पुनर्व्यवस्थापन प्रमुख अक्की यामाकोशी, प्रमुख अभियंता अन्सारी उपस्थित होते. मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी प्रक्रिया होऊ न शकलेला कचरा देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड्सवर टाकण्यात येतो, अशी माहिती प्रशासनाने यामामोटो यांना दिली.जपानमधील योकोहामा शहरात प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केले जाते. या प्रक्रियेमध्ये काही कचरा शास्त्रोक्तरीत्या नष्ट केला जातो. तर काही कचऱ्याचे भराव टाकून व्यवस्थापन केले जाते. योकोहामात मॉल्स, शाळा, स्थानिक संस्था अशा ठिकाणी कचऱ्याचे १० वेगवेगळ्या स्वरूपांत वर्गीकरण केले जाते. महापालिका व योकोहामा या कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून या समस्येविषयी कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, अशी आशा भेटीवेळी व्यक्त करण्यात आली.
कचऱ्यापासून विजेचा पुनर्प्रयोग
By admin | Published: February 11, 2016 3:38 AM