मुंबई : कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धिंगाणा सुरूच असून, गुरुवारीदेखील या दोन विभागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे अधिकारी जयंता सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रालादेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईतदेखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा वाहील.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले की, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांसाठी कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातदेखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर २२ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. २३ आणि २४ जुलै रोजीदेखील हवामान असेच राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.