पत्नीला मुलाचा ताबा न देणाऱ्या पतीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावा - उच्च न्यायालय
By admin | Published: April 20, 2017 03:12 AM2017-04-20T03:12:12+5:302017-04-20T03:12:12+5:30
अल्पवयीन मुलाचा ताबा त्याच्या आईकडे न देता स्वत:कडेच ठेवणाऱ्या लंडनस्थित पतीविरुद्ध रेड कॉर्नर...
मुंबई : अल्पवयीन मुलाचा ताबा त्याच्या आईकडे न देता स्वत:कडेच ठेवणाऱ्या लंडनस्थित पतीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्याचे
निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआय-इंटरपोलला दिले. आॅगस्ट २०१५ मध्ये कुटुंब न्यायालयाने संबंधित व्यक्तीला त्याच्या अल्पवयीन मुलाचा ताबा पत्नीकडे देण्याचा आदेश दिला होता.
मुलाला मुंबईला परत आणण्यासाठी ‘यलो कॉर्नर’ नोटीस बजावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने इंटरपोलला दिले. राजश्री व गणेश (बदलेली नावे) यांचा विवाह २०१० मध्ये झाला. २०१४ मध्ये राजश्रीने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. आॅगस्ट २०१५ मध्ये न्यायालयाने तिचा अर्ज मंजूर करत तिला मुलाचा ताबा दिला. तसेच गणेशला आॅक्टोबर २०१४ पासून पत्नीला देखभालीचा खर्च म्हणून दरमहा २० हजार रुपये देण्याचा आदेश दिला.
मात्र गणेश कुटुंब न्यायालयाचा आदेश मानण्यास तयार नसल्याचे समजल्यावर राजश्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली. गणेशवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी विनंती तिने उच्च न्यायालयाला केली. उच्च न्यायालयाने त्याला यामधून सुटका करण्यासाठी अनेकवेळा संधी दिली. मुलाला लंडनवरून भारतात एखाद्या नातेवाईकाबरोबर पाठवण्याचे निर्देशही दिले. तरीही त्याने प्रतिसाद दिला नाही.
कुटुंब न्यायालयाच्या आदेशाचे पालन लंडनमध्ये केले जाऊ शकते, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. पत्नीने इंग्लंडला यावे. येथे येऊन ती न्यायालयीन लढा सुरू
ठेवू शकते. तिला येथे येण्यासाठी
पैसे देण्यास तयार आहे, असे
गणेशने वकिलाद्वारे न्यायालयाला सांगितले. ‘पतीने कुटुंब न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्याला या आरोपातून (न्यायालयाचा अवमान) सुटका करण्यासाठी संधी दिली होती. मुलाला सुटीमध्ये भारतात पाठवण्यास सांगितले होते. परंतु, त्याने मुलाला भारतात आणले नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने इंटरपोलला दिले. (प्रतिनिधी)