डिप्पी वांकाणी , मुंबई आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदी याच्याविरोधात विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) चे अधिकारी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याच्या प्रयत्नात आहेत. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. आयपीएलचा प्रमुख असताना ललित मोदी याने गैरव्यवहारातून ४७० कोटी रुपये जमविल्याचा आरोप आहे. ईडीने ललित मोदीवर दाखल केलेली मनी लाँड्रिंग बंदी कायद्याअंतर्गत दाखल केलेली केस, २०१३ साली चेन्नई पोलिसांनी नोंद केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. बीसीसीआयने २०१० साली ललित मोदीविरोधात तक्रार दाखल केली असून, ही तक्रार करणाऱ्या एन श्रीनिवासन यांचे निवेदन ईडीने रेकॉर्ड केले आहे. विशेष न्यायालयाचे वॉरंट आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाकडे देऊ, त्यांच्याकडून ते इंग्लंडच्या गृह मंत्रालयाकडे पाठविले जाईल. त्याचबरोबर आम्ही ललित मोदीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस काढावी अशी विनंती सीबीआयला करू. रेड कॉर्नर नोटीस निघाल्यास मोदीने ब्रिटनला पळून जाण्याचा प्रयत्न केला तरीही इंटरपोल त्याला पकडेल, असे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ललित मोदी याने पीएमएलए प्रकरणात आमच्या समन्सची दखल घेतली नाही. फेमा उल्लंघनाच्या केसप्रकरणी दिलेली समन्सही दुर्लक्षित करून चौकशी टाळण्यासाठी तो परदेशी पळाला. त्याचे वागणे अटक वॉरंट काढण्यासारखे आहे. याला ब्रिटनचे गृहखाते कसा प्रतिसाद देते याची वाट पाहिली जाईल. ब्रिटिश अधिकाऱ्यानी ललित मोदी याला अटक करून भारताच्या स्वाधीन केले तर रेड कॉर्नर नोटीस काढण्याची काही गरज राहणार नाही. पण तो लंडनहूनही पळाला तर रेड कॉर्नर नोटीस टाळता येणार नाही.
मोदीविरोधात रेडकॉर्नर नोटीसचे प्रयत्न
By admin | Published: August 06, 2015 1:48 AM