झाकीर नाईकविरुद्धची रेड कॉर्नर नोटीस इंटरपोलकडून रद्द, एनआयएला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:06 AM2017-12-17T01:06:04+5:302017-12-17T01:07:02+5:30
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेली रेड कॉर्नर नोटीस इंटरपोलने रद्द केली आहे.
मुंबई : वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेली रेड कॉर्नर नोटीस इंटरपोलने रद्द केली आहे. भारत सरकारकडे त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत. तसेच त्याच्याविरुद्ध हेतुपुरस्सर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा त्याच्या बचाव पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत हा निर्णय घेतानाच भारताच्या तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत.
नाईकविरुद्धची नोटीस रद्द होणे हा राष्टÑीय तपास यंत्रणेसाठी (एनआयए) मोठा धक्का आहे. झाकीर नाईक हा व्याख्यानातून देशविघातक कृत्यासाठी प्रोत्साहित करतो. त्याचप्रमाणे त्याच्या संस्थेने परदेशातून बेहिशेबी देणग्या जमविल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशविघातक कृत्ये, मनी लॉड्रिंगअन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत बजाविलेल्या नोटीसला हजर न राहिल्याने त्याला इंटरपोलच्या मदतीने अटक करण्याची आवश्यकता आहे, असे विशेष न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी सरकारने केली होती. मात्र, शनिवारच्या निर्णयामुळे नाईकने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान या निर्णयानंतर झाकीर नाईक विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी एनआयए नव्याने
अर्ज दाखल करणार असल्याचे एनआयएच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
ठोस पुरावे नाहीत
नाईकविरुद्ध अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही. शिवाय भारत सरकारकडे त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने नाईक दोषी ठरत नाही. राजकीय हेतुपुरस्सर त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केल्याचा ठपका इंटरपोलने ठेवला आणि नाईकविरुद्ध जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस रद्द केली.