Join us  

रेड क्रॉस संचालकांची तीन कोटींची मालमत्ता जप्त, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 2:08 PM

संस्थेच्या तामिळनाडू शाखेतील संचालक मंडळाचे अध्यक्ष हरीश मेहता, सरचिटणीस एमएसएम नसरुद्दीन, खजिनदार सी. इंद्रनाथ, संस्थेचे सहसचिव मनीष चौधरी यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या तिजोरीत असलेल्या पैशांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

मुंबई : आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा या आणि अशा विविध सेवाभावी कार्यांत १००हून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या तामिळनाडू शाखेच्या संचालक मंडळाने केलेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांची ३ कोटी ३७ लाखांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) जप्त केली. २०२० पासून सीबीआयही संस्थेत झालेल्या घोटाळ्याचा तपास करत आहे.

संस्थेच्या तामिळनाडू शाखेतील संचालक मंडळाचे अध्यक्ष हरीश मेहता, सरचिटणीस एमएसएम नसरुद्दीन, खजिनदार सी. इंद्रनाथ, संस्थेचे सहसचिव मनीष चौधरी यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या तिजोरीत असलेल्या पैशांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या पदाधिकाऱ्यांनी सन २०१० ते २०२० अशा दहा वर्षांच्या कालावधीत संस्थेच्या पैशांचा अपहार करत वैयक्तिक मालमत्ता गोळा केल्याचा आरोप आहे. सन २०२० मध्ये हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा तामिळनाडू पोलिसांच्या लाचलुचपत विभागाने सर्वप्रथम गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. यात मोठा आर्थिक घोटाळा आणि मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या तपासाची सूत्रे हाती घेत जप्तीची कारवाई केली आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटी १९२० मध्ये तत्कालीन संसदेच्या कायद्यान्वये स्थापन झालेली देशातील एक प्रमुख संस्था आहे.  या संस्थेची देशभरात ११०० कार्यालये आहेत.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयधाड