Join us

तोट्यातील लाल परीला मिळाला मालवाहतुकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेली एस.टी. महसूलवाढीसाठी विविध उपक्रम राबवीत आहे. त्यानुसार एस.टी. महामंडळ मालवाहतूक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेली एस.टी. महसूलवाढीसाठी विविध उपक्रम राबवीत आहे. त्यानुसार एस.टी. महामंडळ मालवाहतूक क्षेत्रात उतरले असून, या मालवाहतुकीला कोरोनाच्या काळात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ८१,३१० फेऱ्यांतून साडेसहा लाख मेट्रिक टनांची मालवाहतूक करण्यात आलेली आहे. त्यातून ४७ कोटी ७५ लाख रुपयांचा एस.टी.ला महसूल मिळालेला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील एस.टी. महामंडळाची चाके थांबली होती. त्यामुळे एस.टी. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला. परिणामी हा तोटा भरून काढण्यासाठी आणि महामंडळाचा महसूल वाढविण्याकरिता १ मे २०२० रोजी एस.टी.ने मालवाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण केले. प्रवासी गाड्यांमध्ये अंशतः काही बदल करून मालवाहतुकीसाठी वाहन तयार करण्यात आले होते. सध्या एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात राज्यभरात १,१५० एस.टी.चे मालवाहतूक ट्रक आहेत. आतापर्यंत एस.टी.ने एक कोटी १९ लाख किलोमीटर मालवाहतूक केली आहे; तर २५ मार्च २०२१ रोजी प्रतिदिन सरासरी २६० एस.टी.च्या मालवाहतूक ट्रकच्या फेऱ्या होत असून, त्यातून एस.टी. महामंडळाला २० लाख रुपये दैनंदिन महसूल प्राप्त होत आहे.

इंधन कडाडल्याने दरात वाढ

एस.टी. महामंडळाने सुरुवातीला ३२ रुपये प्रतिकिलो मीटर या दराने मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केला होता. नंतर २० जुलै २०२० रोजी मालवाहतुकीचा दर ३५ रुपये प्रतिकिलोमीटर करण्यात आला. आता नव्या वर्षात सतत इंधनदर वाढत असल्याने पुन्हा एकदा एस.टी. महामंडळाने मालवाहतुकीच्या दरात वाढ केली आहे. १०० किलोमीटर मालवाहतुकीसाठी प्रतिकिलोमीटर ४६, रुपये तर १०१ ते २५० किलोमीटर मालवाहतुकीसाठी ४४ रुपये आणि २५१ कि.मी.च्या पुढील मालवाहतुकीसाठी ४२ रुपये प्रतिकिलोमीटर दर निश्चित करण्यात आला आहे.