Join us

भाकपमध्ये विलीन होणार लाल निशाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 6:46 AM

भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस.के. लिमये, भाऊ फाटक, यशवंत चव्हाण आणि लक्ष्मण मेस्त्री यांना पक्षाबाहेर पडावे लागले.

 मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस.के. लिमये, भाऊ फाटक, यशवंत चव्हाण आणि लक्ष्मण मेस्त्री यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर १९६५ साली भाकपमध्ये फूट पडत लाल निशाण पक्षाची स्थापनाही झाली. मात्र तब्बल ७५ वर्षांनंतर मतभेदांना तिलांजली देत कॉम्रेड यशवंत चव्हाण वयाच्या९८व्या वर्षी सहकाºयांसमवेत भाकपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी गुरुवारी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.रेड्डी म्हणाले की, वरळीच्या आदर्शनगर येथील डॉ. खरूडे सभागृहात १८ आॅगस्टला विशेष कार्यक्रमात ही घोषणा केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्यसाधत भाकपचे राष्ट्रीय सचिवकॉम्रेड सुधाकर रेड्डी आणि खासदार कॉम्रेड डी. राजा उपस्थित राहणार आहेत. देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान आतून पोखरण्याचे काम सुरूआहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विविधतेत एकता या मूल्यांवरच हल्ले होत आहेत. खासगीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची लूट होत असून कामगारांच्या कायद्यांतही कामगारविरोधी बदल केले जात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, आंबेडकरवादी पक्ष-संघटना संघर्ष आणि प्रबोधनाचे काम करत आहेत. फॅसिझमविरोधी संयुक्तपणे लढण्यासाठी लालनिशाण पक्षाचे भाकपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लाल निशाणतर्फे या पत्रकार परिषदेवेळी कॉ. एम.ए. पाटीलआणि मिलिंद रानडे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी अधिकृत घोषणा करत भाकपमध्ये जाण्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. तर भाकपचे डॉ. भालचंद्र कानगो आणि प्रकाश रेड्डी यांनी लाल निशाण पक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले. सोव्हिएत क्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही एकजूट श्रमिकांच्या चळवळीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास एम.ए. पाटील यांनी व्यक्त केला.