लाला माती ठरतेय शिवाजी पार्काची समस्या, पालिका करणार तज्ज्ञ सल्ल्लागारांची नियुक्ती
By सीमा महांगडे | Published: October 29, 2023 12:54 AM2023-10-29T00:54:15+5:302023-10-29T00:55:00+5:30
Mumbai: सतत वर्दळ असलेल्या दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी मॉर्निग वॉक- इव्हनिंग वॉकसाठी येणाऱ्या हजारो लोकांना मोकळी हवा देणारे, शेकडो खेळाडू घडवणारे शिवाजी पार्क( छत्रपती शिवाजी महाराज मैदान ) गेल्या काही वर्षांत धुळीचे केंद्र बनले आहे.
मुंबई - सतत वर्दळ असलेल्या दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी मॉर्निग वॉक- इव्हनिंग वॉकसाठी येणाऱ्या हजारो लोकांना मोकळी हवा देणारे, शेकडो खेळाडू घडवणारे शिवाजी पार्क( छत्रपती शिवाजी महाराज मैदान ) गेल्या काही वर्षांत धुळीचे केंद्र बनले आहे. शिवाजी पार्कचे सौंदर्यीकरण करण्यासाठी वापरली जाणारी लाल मातीच अयोग्य व्यवस्थापनामुळे समस्या ठरली आहे. दरम्यान धुळीच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करुन, त्यांच्या सल्ल्याने प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय देखील पलिक प्रशासनाने घेतला आहे.
शिवाजी पार्कमधून उठणाऱ्या धुळीच्या लोटांचा मागोवा घेत ही धूळ नेमकी कुठून येते, त्याची कारणे व उपाय घेऊन अनेक स्थानिक, अनेक वर्षांपासून घेत असून वारंवार पलिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केल्या जात आहेत. वातावरणातील सततची धूळ मैदानात फिरायला आलेल्या लहानग्यांच्या नाकातोंडात जाते. खेळाडूंना या धुळीचा त्रास होतो. मैदानाभोवती फेऱ्या मारणाऱ्यांनाही नुसत्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूक्ष्म धूलिकण यांचा त्रास होतो. शिवाजी पार्क परिसरात घरे असणाऱ्यांना तर २४ तास याच हवेत श्वास घ्यावा लागतअसून या इमारतीच्या भिंतीवर साचणारा धुळीचा थर या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करतो. दरम्यान मैदानातील लाला माती काढून टाकण्याची विनंती ही नागरिक करत आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क व तेथील नागरिकांची भेट घेऊन महापरिनिर्वाण दिनाचे कामकाज झाल्यानंतर धूळ प्रदूषण विषयक कामे हाती घेण्यात येतील असे स्पष्ट केले आहे.
इतर विभागांच्या सूचना ही घेणार
६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱया अनुयायांची शिवाजी पार्कात व्यवस्था करण्यात येते. त्यानंतर पार्कातील धूळ प्रदूषण कायमस्वरुपी रोखण्याकरीता कामे करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. दरम्यान हे मोठ्या स्वरुपाचे काम असून पर्यावरण, इमारत बांधकाम, पर्जन्य जल संचयन, मालमत्ता विभाग, विकास नियोजन विभाग,हेरिटेज, उद्यान विभाग इत्यादी विभागांच्या अभिप्रायांचा समावेश करून या उपाय योजना आलेल्या जातील असे ही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
मैदानावरील हिरवळ वाढवण्यासाठी प्रयत्न
शिवाजी पार्कात सध्या रोज पाणी फवारण्याकरीता सुमारे २,९०,००० लीटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे तयार करण्यात आलेल्या ३५ रिंगवेल विहिरींमधून उपलब्ध होणारे पाणी या मैदानावर दररोज फवारुन धूळ थोपविण्याचे प्रयत्न करण्यात येतात. तसेच मैदानावरील हिरवळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.