Join us

पुनर्विकसित इमारतीचे प्लास्टर कोसळू लागले

By admin | Published: August 04, 2015 2:29 AM

आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुनर्विकासांतर्गत उभारलेल्या इमारतीतील हक्काच्या घरात जाण्याआधीच रहिवासी धास्तावल्याचे चित्र मुलुंडमध्ये

मुंबई : आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुनर्विकासांतर्गत उभारलेल्या इमारतीतील हक्काच्या घरात जाण्याआधीच रहिवासी धास्तावल्याचे चित्र मुलुंडमध्ये पाहावयास मिळत आहे. नवीन उभारलेल्या इमारतीच्या गृहप्रवेशापूर्वीच इमारतीचे प्लास्टर ढासळण्यास सुरुवात झाल्याने या इमारतीचे पुढे काय होणार? ही चिंता त्यांना सतावत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.मुलुंड पूर्वेकडील न्यू पीएमजीपी या म्हाडा वसाहतीचा रिचा रिएलिटर्स या खासगी विकासकाकडून पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. मागील आठ वर्षांमध्ये या ठिकाणी २२ मजल्यांच्या ६ इमारती उभारण्यात आल्या. रहिवाशांसाठी उभारण्यात आलेल्या या इमारतीचा लवकरच रहिवाशांना ताबा मिळणार आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून या इमारतीचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडल्याने रहिवासी चक्रावले आहेत.अजून प्रवेशही केलेला नाही, त्याआधीच प्लास्टर कोसळण्यास सुरुवात झाली. आता पुढचे संपूर्ण आयुष्य या इमारतीत कसे घालवणार, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे स्थानिकांनी बोलून दाखविले. याच्या निषेधार्थ रहिवाशांनी न्यू पीएमजीपी म्हाडा पुनर्विकास संघर्ष समितीने बॅनरही त्या परिसरात लावले आहेत. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने तत्काळ ते प्लास्टर निघालेल्या भागात मलमपट्टी करण्याचे काम केले. याबाबत रिचा रिएलिटर्सचे प्रतिनिधी असलेले दिनेश साळवी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी उलट उत्तरे देत बोलण्यास टाळाटाळ केली. (प्रतिनिधी)