मुंबई : सांताक्रूझ-खार येथील संरक्षण दलाच्या जमिनीवरील घरांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे विद्यमान भाजप खासदारांविरोधात परिसरात नाराजीची पत्रके लावण्यात आली होती. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीत येथे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासासाठी मतदारांनी आग्रही भूमिका घेतली आहे. आमच्या घराचा प्रश्न सोडवा, अशी मागणी मतदारांनी भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांकडे केली आहे.
रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासासाठी मतदारांनी मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसला टाळून भाजपला मतदान केले. मात्र, तिसरी निवडणूक आली तरी उत्तर मध्य मुंबईतील सांताक्रूझ- खार येथील संरक्षण दलाच्या जमिनींवरील ९,५०० घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.
केंद्राकडून राज्य सरकारला संरक्षण दलाच्या जमिनीबाबत ना-हरकत पत्र मिळाले, ना हा विषय पुढे मार्गी लागला. त्यामुळे सांताक्रूझ, खार रहिवाशांना पुन्हा येणाऱ्या पावसाळ्यात बकाल झोपडपट्टीत दिवस काढावे लागणार आहेत.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत पुनर्विकासाचा विश्वास देऊन मते मागण्यात आली होती. आता १० वर्षे झाली, अद्याप निर्णय झालेला नाही. फक्त आश्वासनाचे फलक लावले गेले. तेव्हा मतदार म्हणून आम्ही काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही उमेदवारांकडे आमची व्यथा मांडणार आहोत. हे दोन्ही उमेदवार आमच्या विभागासाठी नवीन आहेत. त्यामुळे त्यांनी आमचा पुनर्विकास किती महत्त्वाचा आहे, हे सांगणार आहोत.- विनोद रावत, अध्यक्ष, माझे घर प्रतिष्ठान, सांताक्रूझ