वेरावली जलाशय येथील जुन्या मनपा कर्मचारी वसाहतींचा पुनर्विकास करा, वायकर यांचं पालिका आयुक्तांना पत्र
By मनोहर कुंभेजकर | Published: June 8, 2023 12:40 PM2023-06-08T12:40:53+5:302023-06-08T12:45:33+5:30
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात वेरावली जलाशय १ व २ मनपा कर्मचारी वसाहत आहे.
मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात वेरावली जलाशय १ व २ मनपा कर्मचारी वसाहत आहे. या वसाहतीत कर्मचारी वसाहत ए, बी व सी विंगमध्ये मिळून एकुण २४ सदनिकाधारक वास्तव्य करीत असून या इमारती १९६५ साली बांधण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर कर्मचारी वसाहत १ ते ५ या जी अधिक २ प्रकारच्या असून यात एकुण ५५ कुटुंबे वास्तव्य करीत असून या इमारती १९७५ साली बांधण्यात आल्या आहेत. या वसाहतीत ट्रान्झिट कॅम्प ही असून यात ८ कुटुंबे वास्तव्य करीत आहे. या सर्व इमारतींना जवळपास सुमारे ५० ते ६० वर्ष पूर्ण होत असून त्या जीर्ण अवस्थेत आहेत.
येथील जीर्ण झालेल्या इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अद्यापपर्यंत कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास केल्यास येथील रहिवाशांना सदनिका दिल्यानंतरही उपलब्ध होणारी अतिरिक्त घरे मनपाच्या अन्य कर्मचार्यांना देणे शक्य असल्याने, येथील इमारतींचा पुनर्विकास करण्यात यावा, असे पत्र जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल यांना पाठविले आहे.
या वसाहतीतील ए,बी व सी विंगच्या इमारतींच्या डागडुजीसाठी अद्यापपर्यंत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. तर इमारत क्रमांक १ ते ५ वर सुमारे ३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करुन देखील अनेक सदनिकांमध्ये तसेच इमारतींमध्ये छातावरील स्लॅबचे तुकडे पडून दुर्घटना ही घडण्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी मोठया प्रमाणात जागा उपलब्ध असताना ही येथे राहणारी लोकवस्ती ही फार कमी आहे. त्यामुळे येथील उर्वरीत जागा वाया जात असून त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करणे महापालिकेला शक्य असल्याचे, वायकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
त्यामुळे येथील ५० ते ६० वर्ष जुन्या असलेल्या इमारतींचा पुनर्विकास केल्यास येथील रहिवाशांना सदनिका दिल्यानंतर ही अतिरिक्त निर्माण होणारी घरे महानगरपालिकेतील अन्य कर्मचार्यांना देणे प्रशासनाला शक्य होणार असल्याने इमारतींच्या पुनर्विकासाला प्राधान्य देऊन, रहिवाशांना दिलासा द्यावा, असेही वायकर यांनी मनपा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
असा झाला इमारतींच्या डागडुजीसाठी खर्च
- ए, बी व सी विंगच्या इमारतींच्या डागडुजीसाठी सन २०११-१२ साली रुपये ५० लाख खर्च
-२०१९-२० मध्ये रुपये ५२ लाख खर्च
- इमारत क्रमांक १ ते ५ वर २०१२-१३ मध्ये रुपये ९० लाख खर्च
- २०१८-१९ मध्ये १ कोटी ९० लाख रुपये खर्च