महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम रेल्वेतील महत्त्वाचे टर्मिनस म्हणून वांद्रे टर्मिनस ओळखले जाते. पश्चिम रेल्वेवरील गुजरात, राजस्थानसह उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक या स्थानकातून होते. वांद्रे टर्मिनसच्या ४२ हजार ३६८ चौरस मीटर जागेत २०० कोटी रुपये खर्च करून या स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तर ऐतिहासिक महत्त्वप्राप्त वांद्रे स्थानकाचाही विकास युनेस्कोच्या मदतीने होणार आहे.आंतरराष्ट्रीय स्विस चॅलेंज पद्धतीने या स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे. स्थानकांच्या पुनर्विकासानंतर ४५ वर्षांच्या करारावर ही जागा खासगी विकासकाला देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर जागतिक मानांकनावर आधारित स्थानकाचा विकास होणार असून स्थानकात सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. शिवाय वॉकवे, सामान तपासणी मशिन, सेल्फ तिकीट सेवा, अत्याधुनिक रॅम्प, एलिव्हेटेड डेस्क या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. शिवाय स्थानकांच्या मोकळ्या जागेत बूक शॉप, प्रार्थना कक्ष, फूड मॉल उभारण्यात येणार आहे.वांद्रे येथून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ४ किलोमीटरवर आहे. तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित वांद्रे-कुर्ला संकुल आणि रस्ते वाहतुकीसाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळ असल्याने वांद्रे टर्मिनस स्थानकाचे दळणवळणातील महत्त्व दिसून येते. स्थानकावर ७ फलाट असून प्रवाशांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे. तसेच शौचालये, सार्वजनिक विश्रामगृहासह महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रामगृह आहेत. वाहनतळ, आरक्षण केंद्र, वैद्यकीय आपत्कालीन सुविधा स्थानकांवर पाहायला मिळतात.हेरिटेज दर्जा असलेल्या वांद्रे स्थानकाचा युनेस्कोच्या (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) मदतीने विकास करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार झाला असून लवकरच १४६ वर्षे जुन्या वांद्रे स्थानकाला नवी झळाळी मिळणार आहे. वांद्रे स्थानक हे दीडशे वर्षे जुने असून गॉथिक शैलीत त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर १८६४ रोजी हे स्थानक सुरू झाले तर २४ वर्षांनी म्हणजेच १८८८ साली वांद्रे स्थानक इमारत बांधण्यात आली. देशातील स्वच्छ स्थानकांच्या यादीत वांदे्र स्थानकाने १५ वा क्रमांक पटकावला आहे.पुनर्विकासानंतर मिळणाऱ्या सुविधाविमानतळाच्या धर्तीवर स्थानकाचा विकास होणार असून स्थानकात सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. सेल्फ तिकीट सेवा, अत्याधुनिक रॅम्प, पदपथांना जोडणारे एलिव्हेटेड डेस्क या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. स्थानकांच्या मोकळ्या जागेत बूक शॉप, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, प्रार्थना कक्ष, फूड मॉल उभारण्यात येणार आहे.
वांद्रे टर्मिनसच्या ४२ हजार ३६८ चौरस मीटर जागेचा पुनर्विकास
By admin | Published: May 22, 2017 2:31 AM