बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नायगाव-दादर व ना. म. जोशी मार्ग-परळ येथे उभारण्यात आलेल्या, नमुना निवासी पुनर्विकास सदनिकेचे उद्घाटन नायगाव-दादर येथे २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे.म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे भूमिपूजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आले. या प्रकल्पाचा आराखडा व नियोजन लक्षात घेता, हा देशातील मोठ्या नागरी पुनरुत्थान प्रकल्पांपैकी एक ठरेल. बीडीडी चाळीतील पात्र निवासी भाडेकरूंना ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची निवासी पुनर्विकास सदनिकामालकी तत्त्वावर मोफत दिली जाणार आहे.नायगाव-दादर येथील बीडीडी चाळ ६.४५ हेक्टरवर स्थित असून, ३,२८९ निवासी सदनिका असलेल्या या चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रो या बांधकाम एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ना. म. जोशी मार्ग-परळ येथील ५.४६ हेक्टर जमिनीवर स्थित बीडीडी चाळीत २,५३६ निवासी सदनिका असून, या चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी शापूरजी अँड पालनजी या बांधकाम एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या ७ वर्षांत टप्प्याटप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास; नमुना सदनिकेचे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:07 AM