सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास, आश्रय योजनेंतर्गत ३०० चौरस फुटांच्या सदनिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 10:46 PM2021-06-16T22:46:27+5:302021-06-16T22:50:02+5:30

घनकचरा खात्यांतर्गत दोन पाळ्यांमध्ये २९ हजार ६१८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ४६ ठिकाणी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये पाच हजार ५९२ कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देण्यात आली आहेत.

Redevelopment of cleaners' colonies, 300 square feet flats under the shelter scheme | सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास, आश्रय योजनेंतर्गत ३०० चौरस फुटांच्या सदनिका

सांकेतिक छायाचित्र

googlenewsNext

मुंबई- महापालिकेच्या घनकचरा खात्यात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जुन्या वसाहतींचा आश्रय योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प संथगतीने सुरू आहे. सध्या हे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय दीडशे चौरस फुटांच्या घरात दाटीवाटीने राहत आहेत. मात्र वसाहतींचा पुनर्विकास झाल्यानंतर त्यांना किमान तीनशे चौ. फुटांची नवीन सदनिका मिळणार आहेत. (Redevelopment of cleaners' colonies, 300 square feet flats under the shelter scheme)

घनकचरा खात्यांतर्गत दोन पाळ्यांमध्ये २९ हजार ६१८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ४६ ठिकाणी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये पाच हजार ५९२ कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देण्यात आली आहेत. चाळी व इमारती या स्वरूपातील या वसाहती सन १९६२ मध्ये बांधण्यात आल्या आहेत. येथे दीडशे चौ. फुटांची घरे आहेत. त्यामुळेच पालिकेने या वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला.

सफाई कर्मचाऱ्यांच्या ४६ पैकी ३४ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यापैकी सध्या तीन वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ' ए' वार्डातील राजवाडकर स्ट्रीट ,पलटन रोड आणि ' बी' वार्डातील वालपाखाडी या तीन वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. मेसर्स देव इंजिनिअर्स आणि मेसर्स ट्रान्सकॉन शेठ क्रियेटर्स प्रा. लि. या ठेकेदारांना तब्बल ५२६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे.

- पालिकेच्या राजवाडकर वसाहतीचे क्षेत्रफळ ४१६६.९ चौ.मिटर एवढे असून १५५ घरं आहेत. १.३३ एफएसआय वापरून पुनर्विकासानंतर तेथे ३०० चौ. फुटांच्या १२० सदनिका बांधण्यात येणार आहेत.

-  पलटन रोड वसाहतीचे क्षेत्रफळ ५,२९१.७ चौ. मिटर इतके असून तेथे सध्या २९६ घरं आहेत. ५.४० एफएसआय वापरून पुनर्विकासानंतर त्या ठिकाणी ३०० चौ. फुटांच्या ५२२ सदनिका आणि ६०० चौ. फुटांच्या १६ सदनिका बांधण्यात येणार आहेत.

- वालपाखाडी वसाहतीचे क्षेत्रफळ ६,०९७ चौ. मिटर इतके असून तेथे सध्या ३७६ घरं आहेत. ५.४० एफएसआय वापरून पुनर्विकासानंतर त्या ठिकाणी ३०० चौ. फुटांच्या ५६८ सदनिका आणि ६०० चौ. फुटांच्या ६६ सदनिका बांधण्यात येणार आहेत.

Web Title: Redevelopment of cleaners' colonies, 300 square feet flats under the shelter scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.