मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कामाठीपुरा येथील इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यासंदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करून सर्वेक्षणाला सुरुवात करावी, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या आरआर मंडळास मंगळवारी दिले. यासह मुंबईकरांना म्हाडामार्फत स्वस्तातील घरे देण्याचा विचार सुरू असून तशा सूचना म्हाडा अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयामध्ये आव्हाड यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. कामाठीपुरा येथील सुमारे ४० एकर जमिनीवर वसलेल्या एक हजार इमारतींपैकी ७०० इमारती आणि चाळी १०० वर्षे जुन्या असून अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. किमान ५० ते १८० चौ. फुटांच्या छोट्याशा खोलीत येथील रहिवासी धोकादायक अवस्थेत राहत असल्याने हा पुनर्विकास एक आव्हानात्मक बाब ठरणार आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने सैफी-बुºहाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टच्या (एसबीयूटी) धर्तीवर कामाठीपुरा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश या वेळी आव्हाड यांनी दिले.
या बैठकीत सन १९६९ नंतरच्या उपकरप्राप्त इमारतींसंदर्भात धोरण ठरविण्याच्या अनुषंगाने विकासकांबरोबर झालेल्या चर्चेत उपकरप्राप्त इमारतींच्या समूह पुनर्विकासासाठी मुंबईतील उपकरप्राप्त जमिनींचे मालक, भाडेकरू- रहिवासी यांनी पुढे येण्याची गरज आव्हाड यांनी व्यक्त केली. तसेच वास्तुशास्त्रज्ञांबरोबर झालेल्या बैठकीत म्हाडाच्या मुंबईतील जुन्या वसाहतींचा समूह पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात यावेत तसेच पुनर्विकास करताना पुनर्विकसित इमारतींमध्ये मूळ रहिवाशांना देण्यात येणाºया पुनर्विकसित सदनिकांचे आकारमान निश्चित करण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.या वेळी गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासह म्हाडातील अधिकारी उपस्थित होते.‘बायोमेट्रिक सर्वेक्षण करावे’राज्यातील घरांची वाढती मागणी आणि पुरवठा यातील वाढती तफावत लक्षात घेता गृहनिर्मितीच्या कामाला वेग देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडाच्या अखत्यारीतील संक्रमण शिबिरातील भाडेकरूंचे विविध वर्गातील पात्रता निश्चितीसाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण करावे, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.