कामराजनगरचा पुनर्विकास रखडला
By admin | Published: May 31, 2016 03:25 AM2016-05-31T03:25:48+5:302016-05-31T03:25:48+5:30
राजकीय अनास्था आणि प्रशासनाच्या दुरवस्थेमुळे घाटकोपरमधील कामराजनगरातील पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे पडकी चाळ व संक्रमण शिबिरात दिवस काढावे
मुंबई : राजकीय अनास्था आणि प्रशासनाच्या दुरवस्थेमुळे घाटकोपरमधील कामराजनगरातील पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे पडकी चाळ व संक्रमण शिबिरात दिवस काढावे लागत आहेत. महापालिकेने परिसरातील सार्वजनिक शौचालये पाडल्याने मोठी गैरसोय झाली आहे. लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष आहे. या व परिसरातील अन्य विविध समस्या घाटकोपरवासीयांनी ‘लोकमत’समोर मांडल्या. त्यासाठी निमित्त होते ते ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाचे.
घाटकोपर पूर्वेकडील कामराजनगर येथील मुत्तू मारिया मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो रहिवाशांनी उपस्थित राहत आपले गाऱ्हाणे मांडले. या वेळी व्यासपीठावर मनसे शाखा अध्यक्ष संतोष पिंगळे, अॅड. राजा राजापूरकर, ज्येष्ठ नागरिक सीताराम खेडेकर, गंगाराम घाटवळ तसेच ‘लोकमत’चे वितरण विभागाचे व्यवस्थापक शरद सुरवसे, साहाय्यक वितरण व्यवस्थापक संजय पाटील यांच्यासह संपादकीय विभागाची चमू उपस्थित होती. एसआरए अंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकासाची समस्या नागरिकांनी प्रकर्षाने मांडली.
स्थानिक संजय सुर्वे म्हणाले, घाटकोपर पूर्वेकडील कामराजनगर परिसरात ४५ ते ५० वर्षांपासून हजारो कुटुंबे राहतात. इतरांप्रमाणे आम्हीही चाळीतून इमारतीतील फ्लॅटमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले. मात्र या स्वप्नामुळेच घात झाल्याची भावना आता मनात निर्माण झाली आहे. २००५ सालापासून येथे पुनर्विकासाच्या योजना केवळ कागदावर मांडल्या जात आहेत. कसलाही करार न करता रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठविण्याची घाई केली जाते. त्यात जे संक्रमण शिबिरात गेले त्यांनाही उद्या हक्काचे घर मिळेल की नाही, या संभ्रमात ते लोक राहतात. केवळ निष्कासनाची नोटीस बजावून आमची घरे जमीनदोस्त करण्याचा घाट घातला जात आहे. आमचा विकासकाला विरोध नाही. मात्र सर्वांना घेऊन विकास राबवण्यात यावा. १९७२ सालापासूनची कागदपत्रे असताना आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून आमच्या घरांना पात्र करण्यासाठी आम्ही तहसील विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र अद्याप त्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही.’ (प्रतिनिधी)नगरसेविका केवळ बॅनरवर
संतोष पिंगळे म्हणाले की, मतदानापूर्वी दारोदारी येत असलेल्या नगरसेविकेचे निवडणुकीनंतर दर्शन झाले नाही. त्यांच्या कार्यालयात वारंवार खेपा टाकूनही त्यांची भेट होणे अवघड आहे. समस्यांची बोंब असताना त्या फक्त पोस्टर आणि बॅनरवरच उपलब्ध आहेत. समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. आमच्या समस्येबाबत त्यांनी थेट बिल्डरशी बोलून घ्या, असा सल्ला दिला. अशा वेळी न्याय कुणाकडे मागायचा? त्यामुळे नगरसेविकेच्या कामाबद्दल आम्ही त्यांना शून्य गुण देतो.
वृद्धांना दुचाकीवरून न्यावे लागते शौचास
घर खाली करत नसल्याने विकासकाने आमच्या येथील शौचालय तोडले. दोन ते तीन वेळा त्याच्या या निष्कासनाच्या कारवाईला विरोध केला. मात्र तरीदेखील पालिका आणि पोलिसांना हाताशी धरून त्याने शौचालय पाडले. जवळपास शौचालय नाही. काही दिवसांपूर्वी येथील वृद्ध काकांना जुलाब लागल्याने त्यांना चक्क दुचाकीवरून शौचास नेण्याची वेळ ओढावल्याचे सुबोध घाग यांनी सांगितले. त्यामुळे किमान शौचालयाची गैरसोय दूर करावी, अशीही मागणी त्यांनी केली.निष्पाप बळी : खेळण्यासाठी मैदान नाही. अशात येथील अर्धवट बांधकामाधीन जागेवर येथील चिमुकले खेळण्यासाठी आसरा शोधतात. याच जागेवर मोठ्या प्रमाणात चरे खोदण्यात आले. याच खोदलेल्या चऱ्यांमध्ये होडी सोडत असताना ८ वर्षीय चिमुकला २५ मे रोजी यामध्ये पडून बुडाला. सायंकाळच्या सुमारास मुलाचा शोध सुरू असताना त्याचा मृतदेह या पाण्यात तरंगताना दिसला. त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत या चिमुकल्याला मृत घोषित करण्यात आले. स्थानिकांच्या आक्रोशानंतर पंतनगर पोलीस ठाण्यात आर्यमन विकासकाच्या संचालक मंडळाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये उन्नी गोपाल, समीर नागडा, मुकेश जोशी व कौशिक यांची नावे आहेत. गुन्हा दाखल करून पोलिसांनी जबाबदारी झटकल्याचे स्थानिक सचिन राणे याने सांगितले.