Join us

गोरेगावमधील मोतीलालनगरचा पुनर्विकास अखेर लागला मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 6:46 AM

गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगरचा पुनर्विकास अखेर मार्गी लागला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने मोतीलालनगर पुनर्विकासासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक केली असून, फेब्रुवारीत बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

- अजय परचुरेमुंबई : गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगरचा पुनर्विकास अखेर मार्गी लागला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने मोतीलालनगर पुनर्विकासासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक केली असून, फेब्रुवारीत बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. या पुनर्विकासातून म्हाडाला तब्बल १८ हजार अतिरिक्त घरे उपलब्ध होतील. ही घरे लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना वितरित केली जातील. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर परवडणाऱ्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करून देणार आहे.म्हाडा मोतीलालनगरमधील १४२ एकर जागेचा पुनर्विकास करणार आहे. मोतीलालनगरमधील ३,७०० रहिवाशांना पुनर्विकासांतर्गत टॉवरमध्ये घरे मिळतील. या पुनर्विकासासाठी म्हाडाला ५ कोटींचा खर्च येणार आहे. उर्वरित जागेवर ज्या इमारती म्हाडाकडून उभारण्यात येतील, त्यात १८ हजार घरे म्हाडाला विक्रीसाठी उपलब्ध होतील. या घरांची लॉटरी काढून घरांची विक्री होईल. यातून म्हाडाला अंदाजे २५ हजार कोटींचा फायदा होईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.गेल्या ५ वर्षांपासून मोतीलालनगरचा पुनर्विकास मार्गी लागत नव्हता. यासाठी मोतीलालनगरमधील रहिवासी मोतीलालनगर विकास समितीच्या माध्यमातून म्हाडा आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते.रहिवाशांनी अतिरिक्त बांधकाम केल्यासंबंधीच्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने हे अतिरिक्त बांधकाम अनधिकृत ठरविले आहे. त्यामुळे हे बांधकाम पाडण्याऐवजी रहिवाशांच्या संमतीने म्हाडाने मोतीलालनगरचा पुनर्विकास करावा, असा आदेश न्यायालयाने २०१३ मध्ये दिला. त्यानंतर, म्हाडाने अनधिकृत बांधकामावर हातोडा न मारता, पुनर्विकास करण्याचा निर्णय घेत रहिवाशांना दिलासा दिला होता. मात्र, आता म्हाडाच्या या पुनर्विकासाच्या निर्णयाने मोतीलालनगरमधील रहिवाशांना दिलासा मिळाला असून, मुंबईकरांसाठी अतिरिक्त घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.दोन महिन्यांत काढणार निविदाम्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी बुधवारी तातडीने म्हाडा प्राधिकरणाची बैठक बोलावली. बैठकीत सर्वसंमतीने मोतीलालनगर पुनर्विकासासाठी प्रकल्प सल्लागार कंपनी म्हणून पी. के. दाससह अन्य एका कंपनीची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे, दोन महिन्यांत पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचाही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, म्हाडाच्या मुंबई मंडळाने कामाला सुरुवात केली आहे.

टॅग्स :मुंबई