मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (MMRDA) आज महत्त्वाची बैठक मंत्रालयात पार पडली. महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात संयुक्त करार करण्यात आला.
यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिकखासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दरम्यान, मुंबई महापालिकेप्रमाणेच एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज या बैठकीत दिले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा यांच्या मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास व सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणाऱ्या मोकळया शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे शिदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत खालील प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
- बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम (ठाणे कोस्टल रोड)
- पूर्वमुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते ठाणेपर्यंत विस्तारीकरण प्रकल्प
- पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या ८.२५ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे काम
- कासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्प
- विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (Extened MUIP) ऐरोली बोगदा ते कटाई नाका, गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे काम
- कल्याण बाह्यवळण रस्ता भाग ८ चे (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम