मुंबई : हेरिटेज वास्तू, विविध वस्तूंचे मुख्य मार्केट अशी ओळख असलेल्या क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच नव्या रूपातील मार्केट मुंबईकरांना पाहायला मिळेल. पुनर्विकासात मार्केटची व्याप्ती वाढवली जाणार आहे.
मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांच्या संकल्पनेतून हे मार्केट आकारास आले होते. १८६५ ते १८७१ या कालावधीत मार्केटची उभारणी झाली. हे मार्केट हेरिटेज वास्तूत गणले जाते. या मार्केटची अधूनमधून डागडुजी होत असते.
मुंबईची लोकसंख्या वाढल्यानंतर या मार्केटची उलाढालही वाढली. विविध प्रकारचे विक्रेते आणि त्यांचा माल ठेवण्यासाठी मार्केट अपुरे पडू लागले. त्यामुळे मार्केटचा पुनर्विकास करण्याबरोबरच व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. चार टप्प्यात मार्केटचा पुनर्विकास होणार असून पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे.
दीडशे वाहनांंच्या पार्किंगची व्यवस्था-
१) तिसऱ्या टप्प्याचे काम ९० टक्के, तर चौथ्या टप्प्याचे काम ७५ टक्के झाले आहे.
२) एक एकर जागेत शीतगृह आणि पार्किंगची व्यवस्था असेल.
३) पार्किंमध्ये १५० वाहने पार्क करण्याची क्षमता आहे. मार्केटमध्ये एकूण २५५ गाळे आहेत.
४) हेरिटेज बांधकाम वगळता मोडकळीस आलेला मार्केटचा मागील भाग पाडण्यात आला आहे.