Join us

दादरमधील होलसेल फुल मार्केटचा पुनर्विकास; पालिकेने तयार केला चार मजली आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 10:46 AM

होलसेल फुलांची विक्री करणाऱ्या दादर मधील स्व. मीनाताई ठाकरे मंडईचा पुनर्विकास केला जाणार आहे.

मुंबई : होलसेल फुलांची विक्री करणाऱ्या दादर मधील स्व. मीनाताई ठाकरे मंडईचा पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्याचे काम मुंबई महापालिकेने सुरू केले आहे. सध्या तळमजल्याच्या स्वरूपात असलेल्या या मंडईत फूल विक्रीसोबत वस्तूंच्या विक्रीसाठीही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

 मंडईच्या  पुनर्विकासात तीन ते चार मजल्यांचे बांधकाम केले जाणार असून फूल विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मजला असेल. अन्य वस्तू विक्रीसाठी गाळे उपलब्ध करून दिले जातील.  याआधी पालिकेने तीन मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. महात्मा ज्योतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासाचे काम ४० टक्क्यांपेक्षा जास्त  झाले आहे. शिरोडकर मंडईचेही काम सुरू आहे. हेही काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. बाबू  गेनू मंडईचे काम सुरू असून ही सर्व कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

या मंडईंचाही होणार पुनर्विकास :

बोरिवली मंडई, अंधेरी नवलकर मंडई, चेंबूर लक्ष्मण बाबू मोरे मंडई , मालाड सोमवार बाजार आणि मीनाताई ठाकरे फूल मार्केट.

या ठिकाणी दुरुस्ती सुरू :

मिर्झा गालिब मंडई, ग्रांट रोड लोकमान्य टिळक मंडई, फोर्ट मंडई, जिजामाता मंडई, जे. बी. शहा मंडई, डोंगरी मंडई.

शेडची व्यवस्था :

चेंबूर भाऊराव चेंबूरकर मंडईच्या जुन्या इमारतीचे बांधकाम तोडण्यात आले असून गाळेधारकांना पर्यायी व्यवस्था म्हणून शेड बांधून देण्यात आली आहे.

‘सी’ वॉर्डातील आदमजी पिरजी मंडई तोडण्यात आली असून पर्यायी शिबिराचे बांधकाम सुरू आहे. खेरवाडी मंडईच्या वास्तूचे बांधकाम तोडून नव्याने बांधकाम करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईदादर स्थानक