चेंबूरमध्ये पुनर्विकास घोटाळा, बिल्डरसह सहा जणांवर गुन्हा; मोफत सदनिका देण्याचे आमिष, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 12:35 PM2024-08-09T12:35:48+5:302024-08-09T12:36:29+5:30
बाळकृष्ण चव्हाण यांच्या तक्रारीवरून मे. जी. ए. बिल्डर्स प्रा. लि., अनिल अगरवाल (मृत), सारंग अगरवाल, अनुभव अगरवाल, गोकुळ अगरवाल आणि इतरांविरोधात फसवणुकीसह विश्वासघात, कट रचणे आदी कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबई : चेंबूर येथीन एका जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात ३६ रहिवाशांना मोफत सदनिका देण्याच्या आमिषाने ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मे. जी. ए. बिल्डर्ससह सहा जणांविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.
बाळकृष्ण चव्हाण यांच्या तक्रारीवरून मे. जी. ए. बिल्डर्स प्रा. लि., अनिल अगरवाल (मृत), सारंग अगरवाल, अनुभव अगरवाल, गोकुळ अगरवाल आणि इतरांविरोधात फसवणुकीसह विश्वासघात, कट रचणे आदी कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चेंबूर सुभाष नगर म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक २१ चा पुनर्विकास करण्याबाबत बिल्डरशी करार करण्यात आला होता. करारानुसार या इमारतीतील ३६ रहिवाशांना बिल्डरकडून पुनर्विकसीत इमारतीत ३८५ चौरस फुटांची सदनिका विनामूल्य मिळणार होती. तसेच इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना दरमहा भाडे, कॉर्पस फंड यांसह इतर सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. बिल्डरशी २००३ मध्ये इमारतीच्या पुनर्विकासाबाबत करार झाला होता. त्यानंतर २००८ मध्ये पुरवणी करार केला. मात्र बिल्डरने अद्याप इमारत बांधली नाही. सप्टेंबर २०१८ पासून रहिवाशांना देण्यात येणारे भाडेही बंद केले. बिल्डरकडे विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी पोलिसांत धाव घेतली.
रहिवाशांना फसवूण २०८ फ्लॅटची विक्री
रहिवाशांच्या तक्रारीनुसार जुनी इमारत पाडल्यानंतर ती जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे दाखवून आरएनए कॉन्टिनेन्टल नावाची १५ मजल्यांची इमारत २००८ ते २०१३ या कालावधीत बांधली. बिल्डरने त्यातील २०८ सदनिका विकल्या. मूळ रहिवाशांना घरे दिली नाहीत.